गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ओटीटी प्लॅटफार्मचा नवा चेहरा असणारी मिथिला व्होग मॅगझिनवर झळकली असून तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या दिलेल्या सन्मानाबद्दल मिथिलाने मॅगझिनचे आभार मानले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी चेहरे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत. यात मिथिला पालकर, अमेय वाघ, अमृता सुभाष, आदिती पोहनकर यांचा समावेश होतो. खूप नवनव्या वेबसीरीजमधून नवे चेहरे येत असतानाच व्होग इंडिया या अग्रगण्य मॅगझिनने मिथिलाला आपल्या मुखपृष्ठावर स्थान देणे हे मराठीसह ओटीटी जगतासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.
मॅगझिनवर झळकलेले फोटो शेअर करत मिथिलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आभार मानले आहेत. तसेच, लॉकडाऊनच्या काळा माझी नवी सुरूवात झाली असल्याचे सांगत व्होग इंडियाचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत.
यासंदर्भात बोलताना मिथिला म्हणते, ओटीटी हा फार सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. कारण, इथे देशांच्या मर्यादा नाहीत. इथे कुणीही काहीही कधीही बघू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कामातून जगभरात पोहोचतो. शिवाय, जगभरातले सबस्क्रायबर्स ते पाहू शकतात. यापेक्षा दुसरी आनंदाची बाब काय असेल. अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली.
मिथिला पालकरने इरफान खानसोबत ‘कारवां’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा ‘चॉपस्टिक’मध्ये झळकली होती.