नांदेड : पोलिसांनी डिलिव्हरी बॉयच्या थोबाडीत मारुन मद्याची पिशवी नेली! | पुढारी

नांदेड : पोलिसांनी डिलिव्हरी बॉयच्या थोबाडीत मारुन मद्याची पिशवी नेली!

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्याची पायरी चढतांना घाबरणार्‍या नागरीकांचे पोलिस स्टेशन मध्ये स्वागत करण्यासाठी, त्यांना आपुलकीची वागणूक मिळावी, यासाठी पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारले आहेत. यासाठी अधिकारी,कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले.वरिष्ठ अधिकारी सामान्य नागरीकांशी नाळ जोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांना भाग्यनगर ठाण्यातील अधिकारी,कर्मचार्‍यांनी  मात्र पोलिसांची प्रतीमा जनमानसांत मलीन करण्याचा विडा उचलला आहे की काय,असे त्यांच्या कारनाम्यावरुन दिसते, त्यामूळे येथील ठाणेदारांचे नियंत्रण सुटले आहे की काय असा प्रश्‍न पडला आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका मोबाईल चोरी प्रकरणात खाकीची इभ्रत चव्हाट्यावर आणल्यानंतर भाग्यनगर ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे सामान्य माणसांशी वागण्यात अजूनही सुधारणा झाली नसल्याचे दिसते. या ठाणे क्षेत्रात नेहमीच चित्र-विचित्र प्रकार घडत असतात. आज घडीला जिल्हा स्तरावरचा विचार केल्यास पोलिसांच्या कामगिरीचा आलेख चांगला उंचावलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिस ठाणे चमकदार कामगिरी करत आहेत.चोरीला गेलेला ऐवज चोरट्यांकडून जप्त करुन फिर्यादीला परत करण्यात या दोघांमध्ये स्पर्धा लागलेली आहे;परंतु भाग्यनगर पोलिस ठाण्यातील डिटेक्शन ब्रँच मात्र वसूलीच्या मोहीमेवर असल्याचे एका घटनेवरुन पुढे आले.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांंना सकाळी अकरा वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे तर वाईन मार्ट आणि बिअर बार चालकांना सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत मद्य घरपोहोच सेवा देण्यासाठी परवानगी आहे. जंगमवाडी येथील एका वाईन मार्टचा डिलिव्हरी बॉय शुक्रवार दि.28 मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पिशवीत मद्याच्या बॉटल्या घेऊन घरपोहोच सेवा देण्यासाठी निघाला असतांना तेथे भाग्यनगर ठाण्यातील डी.बी.पथकातील दोघे दुचाकीवर आले आणि त्यांनी डिलिव्हरी बॉयला पिशवीत काय आहे असे विचारले असता त्याने घाबरतच मद्य असल्याचे सांगितले. तु लॉकडाऊन असतांना मद्य विकत आहेस का? असे म्हणत त्याच्या थोबाडीत लगावली आणि त्याच्या हातातील मद्याची पिशवी घेऊन ते निघून गेले;परंतु या बाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद केली नाही.दुसर्‍या दिवशी संबंधीत कर्मचार्‍याने पोलिस ठाण्यात जाऊन विचारणा केली असता हा लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला.

विशेष म्हणजे असा प्रकार तीन वेळा घडला आहे. आठ दिवसापुर्वी हाच डिलिव्हरी बॉय त्याच ठिकाणाहुन मद्याची पिशवी घेऊन निघाला असतांना पोलिसांनी त्याला पिशवीसह ठाण्यात घेऊन गेले अन बराच वेळ त्याला बसविल्यानंतर तडजोड करुन सोडून दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.याच दुकानाच्या मालकाचे गुरुजी चौकात मद्याचे घाऊक दुकान आहे. वीस दिवसापुर्वी येथून क्वार्टरचे दोन बॉक्स घरपोहोच देण्यासाठी जात असतांना पोलिस ते दोन्ही बॉक्स घेऊन गेले, या मद्याची बाजरातील किंमत सुमारे तीस हजार रुपये असल्याचे संबंधित कर्मचार्‍याने सांगितले.भाग्यनगर ठाण्यातील कर्मचारी असे कारनामे करत असल्याने वरिष्ठ अधिकारी करत असलेली कामगिरी नजरेआड जात आहे.


फेब्रुवारी महिन्यात एका मोबाईल चोरी प्रकरणत पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत,फिर्यादीला सन्मानाची वागणूक दिली नसल्याने या प्रकाराची विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी गंभीर दखल घेतली होती.तसेच पुढारी शी संवाद साधतांना त्यांनी दोषीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.पोलिस अधिक्षकांना त्यांनी अहवालही मागितला होता;परंतु निर्णय अजुनही गुलदस्त्यात आहे.किमान या गंभीर प्रकरणाची तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी नोंद घ्यावी, असे अपेक्षित आहे.

Back to top button