गैरसमज ‘नागीण’विषयीचे | पुढारी | पुढारी

गैरसमज ‘नागीण’विषयीचे | पुढारी

डॉ. प्रियदर्शनी जाधव 

लहानपणी संगळ्यांना कांजण्या/वारेफोड्या होऊन गेलेल्या असतात. याच आजाराचा व्हायरस आपल्या शरीरात सक्रिय होऊन नंतर काही भागावर पुरळ उठतात. याला नागीण म्हणतात. या आजाराचे दरवर्षी कोट्यवधी रुग्ण भारतामध्ये आढळतात.

इतका साधारण असा आजार ज्याचे लक्षणावरून अगदी सहजपणे निदान केले जाऊ शकते, जो अ‍ॅलोपॅथी उपचारांनी काही दिवसांतच पूर्ण बरा होऊ शकतो. ज्याच्या निदानासाठी कोणतीही महागडी चाचणीची गरज नाही; शिवाय त्यासाठी लसही उपलब्ध आहे. अशा या त्वचारोगाबाबत लोकांमध्ये फार गैरसमज आहेत.

बर्‍याच जणांचा असा गैरसमज असतो की, या आजाराची सुरुवात शरीराच्या एका बाजूस होऊन तो नंतर पूर्ण  शरीराला सापासारखा विळखा घालतो! कदाचित, यामुळेच त्याला नागीण असे हे नाव पडले असावे! तर काही जणांना असे वाटते की, या आजारामुळे मृत्यूदेखील होतो. हे चुकीचे आहे.

कारणे व प्रकार

कांजण्या व नागीण रोग हे एकाच व्हायरसमुळे होतात तो म्हणजे ‘व्हॅरिसेला झोस्टर’ व्हायरस. लहानपणात कांजण्या उठून गेल्यानंतर हा व्हायरस शरीराच्या नसांमध्ये मुख्यतः Sensory Dorsal Root Ganglion मध्ये निष्क्रिय रूपात राहतो. नंतर काही आजारपणांत रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाली किंवा थंडी, ताप, एडस्मध्ये हा व्हायरस सक्रिय होतो. 

यातीलच अजून एक आजार जो मुख्यतः हा ओठाजवळ होतो, तो म्हणजे  ‘हर्पीज लॅबीयालीस’ (Herpes Labilis) हा Herpes Simplex Virus मुळे होतो; पण याचे होण्याचे कारण नागीणप्रमाणेच आहे. याला उेश्रव डेीशी, ‘जर उठणे’ आशा नावांनी ओळखले जाते.

लक्षणे व त्वचेवर उमटण्याचे स्वरूप

हे दोन्ही आजार होण्याआधी काही उदात्त लक्षणे (Prodromal symptoms) दिसून येतात किंवा नीट लक्ष दिले तर ती लक्षात येऊ शकतात. ही लक्षणे आहेत ताप किंवा कणकण येणे, अंगाच्या एकाच बाजूस टोचल्यासारखे होणे, नंतर ज्या भागावर ही लक्षणे दिसतात तेथे पाणी भरून फोड यायला लागतात. एकदा पाणी भरून फोड यायला लागले की, ताप कमी होतो; पण या आजाराचे दुखणे बरेच दिवस राहू शकते.

नागीण :

नागीण रोगचे स्वरूप एकदम विशिष्ट असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा आजार शरीराच्या एकाच बाजूस उमटतो. आपल्या शरीराच्या नसांच्या रचनेनुसार (Derma tomes) हा एकाच बाजूस पसरतो. उदा. – छातीच्या मध्यभागी सुरू झाला की, तो नसांबरोबर तसाच एकाबाजूने पाठीमागे पसरून पाठीच्या मध्यभागी जाऊन थांबतो. तो कधीही दुसर्‍या बाजूस ओलांडून जात नाही. तसेच शरीराच्या दुसर्‍या कोणत्याही भागावर अशाच पद्धतीने पसरू शकतो. या आजाराचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की, तो एका वेळेला एकाच नसांच्या रचनेनुसार उमटतो. म्हणजेच, तो एक वेळेला एकापेक्षा जास्त नसांवर (Multiple dermatomes) येत नाही; मात्र एखाद्याची रोगप्रतिकारक शक्‍ती अगदीच खालावली असेल, उदा. एच आय. व्ही. एड्समध्ये तर मात्र एकापेक्षा जास्त नसांची गुंतवणूक होऊ शकते. नागीणमध्ये पाणी भरून फोड येण्याआधी 1-2 दिवस त्या जागी अत्यंत वेदना व टोचल्यासारखे होते, खाज होते व नंतर पाणी भरून फोड येऊ लागतात. वेदनेचे प्रमाण आजार वाढेल तसे वाढत जाते. साधारणपणे हे फोड पूर्णपणे जायला 8-10 दिवस लागतात; पण वेदना कमी व्हायला काही महिने लागू शकतात. आजार अंगावर काढला, फक्‍त काही लेप लावले तर वेदना आहे तशा राहतात. आजार औषधे घेतली नाही तरी बरा होतो; पण औषधे घेण्याचा उद्देश आजार बरा करून वेदनादेखील कमी करण्याचा असतो.

 हर्पीज लॅबीयालीस जर ः

हा आजार इतका सामान्य आहे की, प्रत्येक दुसर्‍या व्यक्‍तीमध्ये आढळतोच. साधारण लोकांमध्ये याला ‘जर उठला’ असे म्हटले जाते. यालादेखील उदात्त लक्षणे दिसून येतात. याची सुरुवात होते थंडी, ताप, स्ट्रेस, कोरडे ओठ, औषधे उपचारानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे, एड्स या कारणामुळे. सुरुवातीला ओठाजवळ लालसरपणा येणे, तेथे खाज होते, नंतर तेथे पाणी भरून फोड येऊ लागतात आणि त्या दरम्यान चेहर्‍याच्या ज्या बाजूस फोड उठलेत तेथे वेदना चालू होतात; पण या वेदनांचे प्रमाण नागीणपेक्षा कमी असते. या आजाराचे परत परत होण्याचे प्रमाण नागीणपेक्षा जास्त आहे. साधारणपणे एका वर्षात हा 6-7 वेळा त्याच ठिकाणी उद्भवू शकतो. याची परत परत होण्याची प्रवृत्ती त्या व्यक्‍तीच्या रोगप्रतिकारक शक्‍तीवर अवलंबून असते आणि पहिल्यांदा होणार्‍या आजाराची तीव्रता जास्त असते.

Dermatomes म्हणजे नेमके काय?

Dermatomes हे त्वचेवरचे वेगवेगळे भाग आहेत, ज्याला नसांचा पुरवठा जातो. आपल्या शरीरात व त्वचेला डोक्यापासून पायापर्यंत नसांचा पुरवठा असतो. पुरवठा कोणत्या भागाला आहे त्याप्रमाणे त्याचे नावे आहेत. उदा. – मानेला Cervical C2-C5, छातीला व पाठीला Thorasic T1-T12, कमरेखाली Lumbar L1-L5. शरीराच्या प्रत्येक अर्ध्या भागाला हा नस पुरवठा दोन्ही बाजूंनी वेगवेगळा जातो. म्हणूनच, हा आजार एका बाजूस चालू होऊन शरीराच्या मध्य भागातून दुसर्‍या बाजूला पसरत नाही. त्यामागे आपली ही शरीर रचना आहे! याचाच अर्थ, ज्या नसेमध्ये व्हायरस सक्रिय होतो त्याच Dermatome मध्ये नागीण रोग उमटतो, सगळीकडे नाही!

निदान व उपचार ः

आधी म्हटल्याप्रमाणे या आजाराच्या निदानासाठी कोणत्याही महागड्या चाचणीची आवश्यकता नसते. पेशंटची लक्षणे, आजाराचे स्वरूप, एकूण आजाराचा कालावधी यावरून आजाराचे निदान सहज होऊ शकते. त्याशिवाय, एक छोटीशी Tzankck smear नावाची चाचणी असते, ज्यामध्ये फोड उठलेला भाग मायक्रोस्कोपखाली बघून त्यातील व्हायरस ओळखला जातो.

या दोन्ही आजारांचे मुख्य औषध अपींळ-तळीरश्री. बर्‍याच प्रकारी  Anti-Virals गोळ्या आणि इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. याशिवाय मूळ वेदनांवर दिली जाणारी औषधे, मलमपण आहेत.

Anti-Virals मुख्यतः नागीण रोगाच्या 2-3 दिवसांतच चालू केली जातात. याचे कारण असे की, पहिल्या 2-3 दिवसांत औषधे चालू केली तर आजार वेळेत आटोक्यात येतो व जास्त पसरत नाही. या आजारासाठी जी औषधे वापरली जातात, उदा. Acyclovir, Valacyclovir. ही व्हायरसमधली काही द्रव्ये निकामी करून DNA ची वाढ थांबवतात व या द्रव्याला   निक्रिय करून टाकतात, ज्यामुळे आजार पुढे वाढत नाही.

या आजाराचं सर्वात मूळ Complication ”Post Neuragia”  म्हणजेच आजारामुळे होणार्‍या असहाय वेदना! वेळेवर अपींळ-तळीरी चालू करून या वेदना कमी करता येतात.  Anti-Virals ही औषधे किमान 8-10 दिवस दिली जातात. त्याशिवाय, विशेषतः वेदना कमी करायची औषधे जी या नसांवर काम करतात, ती मात्र काही महिने घ्यावीच लागतात. कारण, आजार जरी बरा झाला तरी वेदना औषधे घेतल्याशिवाय कमी होत नाहीत. 

‘जर’साठी मात्र ट्रीटमेंटचा कालावधी कमी असतो आणि यामध्ये वेदनांचे प्रमाण नागीण इतके नसते; पण हा आजार वारंवार होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला  Anti-Virals घ्यावीच लागतात! ‘जर’साठी किमान 5-7 दिवस औषधे घ्यावी लागतात. एवढ्याने आजार पूर्ण बरा होतो; पण परत डोकं वर काढू शकतो. याचे वारंवार होण्याचे प्रमाण वयानुसार कमी होत जातं.

हा आजार जीवघेणा नाही. तज्ज्ञाकडे वेळेवर व बरोबर उपचार होऊन हा आजार व त्याच्या वेदना पूर्णपणे बर्‍या होऊ शकतात. या आजाराला कारणीभूत आपल्या शरीराची रचना व व्हायरल इन्फेक्शन आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वीपासून चालत आलेले समजांमध्ये काहीच तथ्य नाही. 

 

Back to top button