पुणे : ओतुरात बिबट्याची दुचाकीस्वारावर झेप | पुढारी

पुणे : ओतुरात बिबट्याची दुचाकीस्वारावर झेप

ओतूर;  पुढारी वृत्तसेवा : निलेश घुले या तरुणावर बिबट्याचा हल्ला होऊन १० दिवस उलटले नाही तोच गुरुवारी (दि. २४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी दुचाकीवरून परतणाऱ्या अजित विठ्ठल घुले (रा. घुलेपट, उंब्रज पांध, ओतूर)  या युवकाच्या दुचाकीवर बिबट्याने अचानक झेप घेऊन धडक दिली. त्यामुळे हा युवक दुचाकीवरून पडून किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

रात्रीच्या सुमारास चालत्या दुचाकीवर बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे  युवक घाबरून गाडीसह जमिनीवर आदळल्यामुळे झालेल्या आवाजाने बिबट्याने बाजूच्या शेतात धूम ठोकल्याची माहिती जखमी युवकाने दिलीे. अशाही अवस्थेत या युवकाने दुचाकी उचलून सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना तोच बिबट्या पुन्हा त्याच्याकडे आवाज करीत येत असल्याचे पाहून अजितने घटनास्थळाजवळच असलेले भारत तांबे यांचे घराचा आसरा घेतल्याचे समजते.

ही घटना ओतूर वनविभागाला समजताच वन कर्मचाऱ्यांनी जखमी अजित यास प्रथम ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकामी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अजित यास बिबट्याच्या धडकेने गाडीवरून पडल्याने मुका मार लागला आहे. हा युवक पानसरेवाडी येथून आपल्या घराकडे दुचाकीवरून  येत असताना भारत तांबे यांच्या घराजवळ कुणगी शिवार, जुनी उंब्रज पांध, घुलेपट येथे ही घटना घडली.

१० दिवसांपूर्वी निलेश घुले या तरुणावर याच परिसरात बिबट्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. दोन्ही घटनास्थळामधील अंतर हे सुमारे ७०० मीटर इतके असावे, याचाच अर्थ असा की, हल्ला करणारा बिबट्या अद्यापही पकडला गेला नसून मागील घटनेवेळी वेगळाच बिबट्या पकडण्यात आल्याची बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक बिबट्याच्या  दहशती खाली वावरत आहेत. एकूण या परिसरात बिबट्याची नेमकी संख्या किती? हा प्रश्न अनुउत्तरीत राहिला असून वनरक्षक विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा  पिंजरा लावावा अशी मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत डुंबरे, स्थानिक शेतकरी विकास घुले, विठ्ठल घुले, निलेश घुले, भारत तांबे, दत्तात्रय तांबे, मयूर घुले, रामचंद्र डुंबरे, अमित घुले, विशाल घुले, सचिन डुंबरे, संतोष दुधवडे यांनी केली आहे.

Back to top button