गुंतवणूक : निफ्टीचा गुरुमंत्र! | पुढारी

गुंतवणूक : निफ्टीचा गुरुमंत्र!

“गुंतवणुकीचा सर्वात लाभदायी परंतु मोठी जोखीम असणारा पर्याय म्हणजे शेअर्स गुंतवणूक,” असा व्यापक समज असून, त्याबाबत अनेक गैरसमज द़ृढ संकल्पासारखे घट्ट आहेत. शेअर्समधून मोठा परतावा मिळवायचा तर चांगली गुंतवणूक किंवा यशस्वी गुंतवणूक 70% पेक्षा अधिक हवी (जसे परीक्षेतील गुणवत्ता टक्केवारी असते तसे) असा एक समज आहे.

गुंतवणूक केल्यानंतर सतत ‘उलाढाल’ हवी, नवे शेअर्स घेणे, जुने विकणे यातून परतावा वाढले म्हणजे गुंतवणूक रचना (Portfolio)  सतत बदला असा सल्ला दिला जातो. “शेअर्स निवडताना नफ्याचे प्रमाण, वाढ, व्यवसाय स्वरूप, प्रवर्तक, कर्जाचे प्रमाण अशा अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. तरच तुमची गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते” हे सर्व न करणारे निश्चितच मोठे नुकसान पत्करत असतील असे वाटेल. परंतु असे करणारी म्हणजे उपरोक्त सर्व निकष बाजूला ठेवून गुंतवणूक करणारी व्यक्ती नव्हे, संस्था ही गेल्या 27 वर्षांत 11% चक्रवाढ परतावा देऊ करीत आहे आणि ती आहे निफ्टी! होय. निफ्टीचा हा ‘गुंतवणूक फंडा’ समजून घेतल्यास आपणही गुंतवणूक जंगलातून चांगल्या परताव्याच्या महामार्गावर येऊ शकतो.

निफ्टी ही राष्ट्रीय रोखे बाजाराची संवेदन सूचकांक 50 शेअर्सच्या किमतीतील बदलाचा दर्शक आहे. 1995 मध्ये निफ्टीची सुरुवात 1000 अंकाने झाली व आता तो 16 ते 17 हजार दरम्यान यावर्षी आहे. याचाच अर्थ, 17 पट परतावा 27 वर्षांत निफ्टीने दिला आहे. तो वार्षिक चक्रवाढ पद्धतीने (CAGR-Compounded Annual Grouth Rate) 11.33% इतका आहे. विशेष म्हणजे निफ्टीचा यशस्वी शेअर्स निवडीचा दर (स्ट्राईक रेट) फक्त 55% इतका आहे. त्यात निवडलेल्या शेअर्समध्ये 85 शेअर्सनी उत्तम, तर 67 शेअर्सनी सुमार कामगिरी केली. तरी दीर्घकालीन परतावा उत्तम! हे म्हणजे 55% गुण असणारा उत्तम डॉक्टर होण्यासारखे ठरते!

बागेतील तण उपटणे आणि फुलांना वाढू देणे हे उत्तम माळी करतो. पण गुंतवणूकदार माळी मात्र तण वाढू देतो आणि फुले पूर्ण वाढीअगोदर काढतो. जरा नफा झाला की ते शेअर्स विकायचे व दुसरे अधिक नफा देतील या आरोळे खरेदी करायचे, तर ज्यात नुकसान होत आहे (तण) त्यात पुन्हा पूर्वीचा दर येईल यासाठी वाट पाहत नुकसान वाढवत बसणे हे सर्वच किरकोळ गुंतवणूकदारांचे व्यवच्छेदक लक्षण असते! यातून नफा नसला तरी ‘उलाढालीचे’ समाधान खूप मोठे असते. असे नुकसान अक्कलखाती साठवले जाते!

निफ्टी असा प्रकार न करता शिस्तबद्ध, भावनाशून्य व आकडेवारी आधारित पूर्वनिश्चित तंत्रानेच नवे शेअर्स घेते व जुने बाजूला करते! पण हे सर्व वर्षातून फक्त चार वेळाच! ते पण जर नव्या एखाद्या शेअर्सचा समावेश निकष पूर्ण झाला तरच. पूर्वीच्या निवडलेल्या कंपनीपेक्षा नव्या कंपनीचा बाजारातील विक्री उपलब्ध शेअर्स मूल्य अधिक झाले तरच त्याचा समावेश होतो. वॉरेन बफे यांच्या सूत्रानुसार “जो शेअर्स 10 वर्षांसाठी ठेवायचा नाही तो 10 मिनिटेसुद्धा ठेवू नका” याचा वापर निफ्टी करते. जे सतत वृद्धिंगत आहेत, त्यांना 12.5% वर्षे तर कमी कामगिरी असणारे 4 वर्षेच ठेवतात. प्रारंभापासून 50 च्या यादीत फक्त 9 शेअर्स राहिले, यातून हे स्पष्ट होईल.

मोठा परतावा देणारे 10 पट (टेन बॅगर्स), 100 पट परतावे देणारे कसे निवडावे याबाबत रामबाण फॉर्म्युला देणारे अगिणत तज्ज्ञ आहेत. निफ्टी त्याकडे पाहत नाही. विविध, भरमसाट निकष व तंत्र याचा भडिमार करत उद्याचा इन्फोसिस, रिलायन्स असा अंदाज देणार्‍या बाजारपटूंच्यापेक्षा निफ्टी सरळ ज्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे व त्यामुळेच बाजारमूल्य मिळवले आहे, त्या ‘सिद्ध’ कंपन्यांनाच निवडते. याच निकषावर एशियन पेंट 2012 मध्ये निवडला, पण तोपर्यंत त्यात 10 पट वाढ झाली होती, तरी निकषात बसत असल्याने त्याला घेतले व त्यातून उत्तम परतावा मिळकत राहिला. आतापर्यंत 135 शेअर्स (कंपन्या) निवडल्या व त्यातही पुन्हा फक्त 10 शेअर्सनी 25% परतावा दिला, तर 6 कंपन्या 50 पट व 3 कंपन्यांनी 100 पट परतावा दिला. यातही परत एकूण नफ्यात फक्त 3 कंपन्यांचा वाटा 50% इतका होता व त्यांनी दिलेला परतावा 66800% होता. या तीन कंपन्या म्हणजे रिलायन्स, इन्फोसिस व एचडीएफसी!

निफ्टीचे गुरुमंत्र

निफ्टीच्या गुंतवणूक तंत्राचा वापर आपण केल्यास आपले परतावे जोखीम कमी करून वाढवू शकतो. बाजार कोलाहल न ऐकता कासवगतीने सातत्य ठेवत सिद्धहस्त कंपन्यांना आपल्या गुंतवणूक रचनेत स्थान देणे हा पहिला महत्त्वाचा पाठ आहे. तसेच बाजार हाच निर्णायक असतो, त्यालाच शरण जाणे योग्य. त्यापेक्षा जास्त ‘शहाणपण’ जोपासणारे निश्चितच वेड्यांच्या जत्रेत सापडतात. उत्तम कंपनी, मोठा इतिहास असणारी कंपनीदेखील आपल्या नुकसानीचा ‘विमा’ काढू शकली नाही. त्यामुळे प्रथम बाजारात सिद्ध व्हा मगच विचार करू, हा सोपा नियम आपणही वापरू शकतो.

‘भाव’ हाच परमेश्वर हेच सत्य! ‘कमी दरात घ्या, वरच्या दरात विका’ या ऐवजी चांगल्या दराचे घ्या व आणखी चांगल्या दराने निश्चितपणे विका, हे नवे सूत्र निफ्टी देते. आपण एक निफ्टीची चूक टाळू शकतो. एखादी कंपनी घोटाळ्यात सापडते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास निफ्टी फार वेळ घेते. जसे यस बँक 21 सप्टेंबर 18 मध्ये 29% ने घटला व भाव 228 रु. झाला. परंतु निफ्टीतून बाहेर पडण्यास 19 मार्च 2020 उजाडला. तोपर्यंत तो शेअर 53 रुपये झाला होता. असा प्रकार आपण टाळू शकतो. एखादा मूर्खदेखील नियोजनबद्ध मार्गाने नियोजनाचा अभाव असणार्‍या प्रतिभावंतावर मात करू शकतो, हेच निफ्टीने सिद्ध केले. यशाचा ‘कासव’ आपणही स्वीकारल्यास उत्तम परतावा मिळवू शकतो.

निफ्टीच्या गुंतवणूक तंत्राचा वापर आपण केल्यास आपले परतावे जोखीम कमी करून वाढवू शकतो. बाजार कोलाहल न ऐकता कासवगतीने सातत्य ठेवत सिद्ध हस्त कंपन्यांना आपल्या गुंतवणूक रचनेत स्थान देणे हा पहिला महत्त्वाचा पाठ आहे. तसेच बाजार हाच निर्णायक असतो, त्यालाच शरण जाणे योग्य.

– प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button