प्रयागराजमध्ये भयावह चित्र, गंगेच्या तीरावर मृतदेहांचे दफन सुरूच | पुढारी

प्रयागराजमध्ये भयावह चित्र, गंगेच्या तीरावर मृतदेहांचे दफन सुरूच

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) येथे पुन्हा एकदा गंगा नदीच्या किनारी वाळूत मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरले जात आहेत. फाफमाळ घाटाच्या ताज्या छायाचित्रांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या काळातील आठवण करून दिली आहे. येथे मृतदेह दफन करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. मात्र राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या घाटांवर मृतदेह पुरण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही परंपरेच्या नावाखाली ज्याप्रकारे मृतदेह दफन केले जातात ते अत्यंत चिंताजनक आहे. फाफमाळ घाटात दररोज डझनभर मृतदेह वाळूत पुरले जात आहेत. त्यामुळे सर्वत्र फक्त थडगीच दिसत आहेत.

प्रत्यक्षात मान्सून येण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत गंगा नदीच्या काठावर जे मृतदेह पुरले जात आहेत, तेही नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास ते गंगेत मिसळून जाण्याचा धोका आहे. यामुळे वाळूत पुरलेले मृतदेह गंगेत तर वाहून जातातच, पण त्यामुळे नदीही प्रदूषित होते. मात्र जिल्हा प्रशासनापासून ते महापालिकेपर्यंत सर्व प्रशासकीय घटक याकडे पाठ फिरवत आहेत.

कोरोनाच्या काळात भयावह परिस्थितीचा अनुभव

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर मृतदेह पुरल्याच्या वृत्ताने जगात खळबळ उडाली होती. यानंतर कारवाईचा बडगा उचलत प्रयागराज महापालिकेने शेकडो मृतदेह वाळूतून बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर नदीकाठच्या वाळूत मृतदेह पुरण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. ही बंदी असतानाही आता पुन्हा एकदा गंगा नदीच्या काठावर बिनदिक्कतपणे मृतदेह पुरण्याचा खेळ सुरू आहे.

त्याचवेळी अंत्यसंस्कारासाठी फाफमाळ घाटावर पोहोचलेले लोक घाटाची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगत आहेत. याकडे प्रशासन आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. दरम्यान, फाफमाळ घाटावर अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी किंवा लाकूड उपलब्ध करून दिल्यास अशा प्रकारे मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची गरज भासणार नाही, असे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अनेकांनी भावना व्यक्त केली आहे.

Back to top button