दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानात साम्राज्य | पुढारी | पुढारी

दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानात साम्राज्य | पुढारी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा ‘वाँटेड’ गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये नाही, असा दावा पाक सरकार करीत असते; परंतु दाऊद हा पाकिस्तानमध्येच असून त्याने अमेरिकेत मेक्सिकन ड्रग माफियांनी विविध क्षेत्रात उभ्या केलेल्या साम्राज्यासारखेच आपले साम्राज्य पाकिस्तानात उभे केले असल्याचा दावा एका अमेरिकन खासदारने केला आहे. डॉ. लुईस शेली असे या खासदाराचे नाव आहे. 

‘दहशतवाद व अवैध आर्थिक व्यवहार’ या विषयाशी संबंधित अमेरिकन काँग्रेसच्या एका उपसमितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सदस्यांसमोर बोलताना शेली यांनी ही माहिती दिली आहे. 

मेक्सिकन ड्रग माफियांनी अमेरिकेत आपली साम्राज्ये विस्तारली आहेत. त्याच धर्तीवर डी कंपनीने पाकिस्तानात विविध क्षेत्रांत आपले पाय घट्ट रोवले आहेत. त्यामध्ये शस्त्रांचे स्मगलिंग, बनावट डीव्हीडी, हवाला रॅकेटद्वारा पैशांचे व्यवहार आदी काळ्या धंद्यांचा समावेश असून, पाकिस्तानात आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा त्याचा म्होरक्या असल्याचे शेली यांनी सांगितले आहे. 

दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा भारताने केला होता. जागतिक पातळीवर त्याला पुरेसा पाठिंबा मिळत नव्हता. मात्र, 2003 मध्ये अमेरिकन सरकारने दाऊदचे ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेबरोबर संबंध असल्याचे सांगून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने भारत सरकारच्या दाव्याला बळकटी आली. त्याचबरोबर ‘युनो’नेही आपल्या अँटीटेरर रिझोल्यूशनद्वारा दाऊदवर निर्बंध टाकल्याने दाऊदला उजळ माथ्याने वावरणे अवघड झाले.  अमेरिकेने दाऊदने पाकिस्तानाच आश्रय घेतला असून तो कराचीत आहे व त्याच्याकडे व्यक्‍तिगत वर्गवारीत पाकिस्तानचा पासपोर्टही असल्याचे जाहीर केले आहे. 

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याने शेकडो नागरिकांचा बळी गेला होता. या कृष्णकृत्याबद्दल दाऊद भारत सरकारला हवा आहे. 

भारतीय व अमेरिकन उच्चाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दाऊद पाकिस्तानातील कराचीत असून तेथून तो आपल्या साम्राज्याची सूत्रे हलवतो. 

पाकिस्तानने मात्र दाऊद पाकिस्तानाच असल्याची बाब नाकारली आहे. 

“डी कंपनी ही पाकिस्तानमधील एक महत्त्वाची दहशतवादी संघटना असून त्यांचे मूळ भारतात आहे. पाकिस्तानचे दहशतवादी आंतरराष्ट्रीय ड्रग उद्योगात मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यामध्ये डी कंपनी अग्रभागी आहे. ड्रगच्या धंद्यातून कमावलेल्या पैशातूनच डी कंपनी शक्‍तिशाली बनली असून, त्यांनी आपले अन्य क्षेत्रातही साम्राज्य विस्तारले आहे.” 
– डॉ. लुईस शेली
 

Tags : underwould, Dawood Ibrahim, Empire, Pakistan

Back to top button