चकाकता हिरा : एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग | पुढारी

चकाकता हिरा : एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग

यावेळचा चकाकता हिरा म्हणून “एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग” या कंपनीची निवड केली आहे. कंपनीकडे सध्या 5900 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. याचा अर्थ एवढ्या ऑर्डर्स पुर्‍या करण्यासाठी तिला तीन वर्षे लागतील. इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (EPC) या क्षेत्रात तिची कामे असतात. या क्षेत्रात तिला या वर्षी आणखी1000 ते 1500 कोटी रुपयांची कामे मिळण्याची अपेक्षा आहे. त्याबद्दलची निश्‍चितता येत्या दोन महिन्यात होईल. या कामासाठी तिला कदाचित भांडवलात 140 कोटी रुपयांची भर घालावी लागेल. कंपनीने आपली कर्जेही भरपूर कमी केली आहेत. सध्या या शेअरची किंमत 198 रुपये आहे. वर्षभरात त्यात वाढ होऊन तो भाव 290 रुपयांपर्यंत जावा. 2018 मार्चला संपलेल्या वर्षासाठी कंपनीची विक्री 1332 कोटी रुपयांची होती. मार्च 2019, 2020 व 2021 या येत्या तीन वर्षांसाठी ती अनुक्रमे 2030 कोटी रुपये, 2510 कोटी रुपये व 2825 कोटी रुपये व्हावी. मार्च 2017 ला संपलेल्या वर्षासाठी कंपनीचा नक्‍त नफा 5304 कोटी रुपये होता. मार्च 2018 वर्षासाठी तो 84.3 कोटी रुपये इतका वाढला. येत्या तीन वर्षांसाठी तो अनुक्रमे 125 कोटी रुपये, 162 कोटी रुपये व 175 कोटी रुपये अपेक्षित आहे. मार्च 2017 व मार्च 2018 वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 9.3 रुपये व 12.9 रुपये होते. 2019, 2020 व 2021 वर्षांसाठी ते अनुक्रमे 19.2 रुपये, 24.8 रुपये व 27.5 रुपये व्हावे. कंपनीकडे सध्या असलेल्या कामात दरवर्षी दहा टक्के वाढ होईल. कंपनीचे भाग भांडवल 65.2 कोटी रुपये आहे. मार्च 2018 संपलेल्या वर्षासाठी कंपनीचे किं./उ. गुणोत्तर 23 पट होते. मार्च 2021 साठी ते फक्‍त 7.5 पट असेल. गेल्या काही तिमाहींचा विचार करता कंपनीची विक्री 430 ते 500 कोटी रुपयांमध्ये होती. डिसेंबर 2018 च्या तिमाहीसाठीची विक्री 551 कोटी रुपये होती व ढोबळ नफा 80.6 कोटी रुपये होता.  कंपनीचा नक्‍त नफा डिसेंबर 2018 तिमाहीसाठी 35.2 कोटी रुपये होता. कंपनीला नुकतीच 1600 कोटी रुपयांची कामे मिळाली आहेत. त्यातील एक काम हरियाणा-राजस्थानच्या सीमेवर आहे, तर दुसरे काम अटेली-मंडी रस्त्यावर आहे. ही कामे नॅशनल अ‍ॅथॉरिटी इंडियाने दिली आहेत. सध्या एच. जी. इन्फ्रा भावात 40 टक्के वाढ होऊ शकेल. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 9.9 आहे. 

Back to top button