मुलांना वेळीच द्या फ्लूची लस | पुढारी

मुलांना वेळीच द्या फ्लूची लस

डॉ. सुरेश बिराजदार

इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणार्‍या इन्फेक्शनला ‘सिझनल फ्लू’ असं म्हणतात. या ‘फ्लू’पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध आहे. याला फ्लू शॉटस् असं म्हंटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ‘फ्लू’पासून बचावासाठी लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ‘फ्लू’ विरोधातील लसीमुळे ‘इन्फ्लूएन्झा’ व्हायरसमुळे मुलांना होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात.

कोव्हिड-19 च्या काळात लहान मुलांना फ्लू-शॉटस् देणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना संसर्गाचा धोका कमी होईल. फ्लू शॉट आपल्याला श्वसन संक्रमण आणि इन्फ्लूएन्झापासून मृत्यूला रोखण्यासाठी तसेच त्याच्याशी संबंधित इतर गुंतागुंत रोखण्यास मदत करू शकतो. हे फ्लू शॉटस् 6 महिन्यांवरील मुलांकरिता तसेच प्रौढांकरिता उपलब्ध आहेत.

लहान मुलांना किती फ्लू शॉटस् लागतात?

फ्लूच्या शॉटस्ची संख्या ही वेगवेगळी असू शकते. आपले मुल 6 महिन्यांचे झाल्यापासून फ्लू शॉट द्यावे. त्यानंतर, ते देखील एका महिन्याभरानंतर दुसरा फ्लूचा शॉट देण्यास हरकत नाही. ज्या मुलांचे वय हे 9 वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना यापूर्वी फ्लूचा शॉट दिलेला नाही त्यांनी कमीतकमी 2 फ्लू शॉट घ्यावेत. आपल्या मुलांना आपल्यासाठी कधी फ्लू शॉट घ्यावा लागेल याबद्दल डॉक्टरांशी बोलावे आणि त्यानुसार पर्याय निवडावा.

लसीकरणाची योग्य वेळ

* मुलांना फ्लू शॉटस् देण्यासाठी जास्त उशीर करू नका. आपली मुले व्हायरसपासून सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करणे  सर्वात महत्त्वाचे आहे.

* लसीकरण्याच्या वेळी मुलांच्या स्वच्छतेची पुरेशी खबरदारी घ्यावी आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांकडून वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) वापरली जात आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

* बालरोगतज्ज्ञांसोबत तसेच रुग्णालयाशी संपर्कात राहावे. मुल आजारी पडल्यास आपण काय करावे हे माहीत असणे आवश्यक आहे.

मुलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी 

आपली मुले कोव्हिड -19 संसर्गापासून बचावाकरिता शासन नियमावलींचे पालन करतात का हे पहावे, त्यांचे हात व्यवस्थित धुवावे, त्यांना संतुलित आहार द्यावा, घर आणि घराभोवतालच्या परिसराचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.

 

Back to top button