राज ठाकरे यांच्या सुरक्षेची थट्टा; मनसे नेते बाळा नांदगावकर संतप्त | पुढारी

राज ठाकरे यांच्या सुरक्षेची थट्टा; मनसे नेते बाळा नांदगावकर संतप्त

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही दिवसांपुर्वी आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याचा सुरक्षेचा दर्जा कायम ठेवत एक पोलिस अधिकारी आणि एक अमंलदाराची वाढ करण्यात आली आहे. यावर संतप्त होत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही काय थट्टा लावली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेल्या पार्श्वभूमीवर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आले होते. यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी यासाठी माझ्यासह आमच्या इतर नेत्यांनी गृहमंत्री दिलीप पाटील यांची भेट सुद्धा घेतली होती. शिवाय याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखिल पत्र पाठवले होते. पण, याबाबत राज्य सरकार गंभीर नसून केवळ दोन दोन अधिकारी वाढवले, ही काय थट्टा लावली आहे काय? येवढ्या मोठ्या नेत्याला सुरक्षा का देत नाही असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.

पुढे नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे व मला धमक्या येत आहेत. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे वाढले तसे त्यांचे शत्रू देखिल वाढले आहेत. याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजेत. मुख्यमंत्री तर कुटुंबातलेच आहेत. राजकारणा पलीकडे जाऊन याचा विचार झाला पाहिजे. मुख्यमंत्री यांनी याचा गांभिर्याने विचार करायला हवा अशी आमची मागणी आहे असे बाळा नांदगावकर म्हणाले.

Back to top button