राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी : कुरुंदवाडमध्ये चित्ररथ यात्रेचे जल्लोषी स्वागत | पुढारी

राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी : कुरुंदवाडमध्ये चित्ररथ यात्रेचे जल्लोषी स्वागत

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी कृतज्ञता पर्वांतर्गत चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शाहू विचारांचा जागर सुरू झाला आहे. चित्ररथ यात्रेचे आज ( दि. १३) कुरुंदवाड येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. येथील पालिका चौकात चित्ररथ यात्रेचे आगमन झाल्यानंतर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासाहेब पाटील, उदय डांगे, वैभव उगळे, अजित देसाई यांच्या हस्ते चित्ररथाला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय, या ब्रीद वाक्यातून समाजातील अंतिम घटकापर्यंतच्या सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. यावेळी अरुण आलासे, दयानंद मालवेकर, बाबासाहेब सावगावे, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे आदींनी मनोगते व्यक्त केली.

या चित्ररथात रणरागिणी ताराराणी यांनी छत्रपती शिवरायांचा वारसा राजर्षी शाहूंकडे दिल्याचा पहिला चित्ररथ, राजर्षी शाहूंची वंशवेल, राजर्षी शाहूंचे आधुनिक विचार, त्यांचे शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन, परदेश भेटीदरम्यान घडलेले विविध प्रसंग, राजर्षी शाहूंचा सर्वधर्मसमभावाचा दुसरा चित्ररथ, राजर्षी शाहूंनी सर्वधर्मीयांसाठी उभारलेली धार्मिकस्थळे, त्यासाठी केलेली मदत, सर्व समाजातील लोकांना मंदिरात प्रवेशासाठीचा आदेश, जोतिबाची चैत्रयात्रा, श्री अंबाबाईचा तिसरा चित्ररथ, प्लेगच्या काळातील राजर्षी शाहूंचे कार्य व त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय आदी गोष्टींवर आधारित शिल्पांचा समावेश असलेला चौथा चित्ररथ, जलसिंचन धोरणाच्या घटनेचा पाचवा चित्ररथ, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील विविध प्रसंगांचा वेध घेणारा सहावा चित्ररथ, तर राजर्षींच्या शैक्षणिक कार्यावर आधारित सातवा चित्ररथ असे चित्ररथाचे वैशिष्टय होते.

या चित्ररथयात्रेला पालिका चौकातून सुरवात झाली. पालिका चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बागवान गल्ली, सन्मित्र चौक, नवबाग रस्ता, जुने बसस्थानक, दर्गाह चौक ते गणपती मंदिर या मार्गावरून यात्रेचे नृसिंहवाडीकडे प्रयाण झाले. नागरिकांनी राजश्री शाहू महाराजांचा जयजयकार करून परिसर दुमदुमून सोडला. यात्रेत रामभाऊ माळी, रिजवान मतवाला, चंद्रकांत काळगे, अण्णासाहेब चौगुले, बाबासाहेब नदाफ आदी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button