

नाशिक : पुढारी ऑनलाइन
अकबरुद्दिन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच आता माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही यावर भाष्य केले आहे.
अकबरुद्दिन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, कबरीवर चादर चढवली असे माझ्या कानावर आले आहे. याबाबत मला फारशी कल्पना नाही, त्यामुळे लगेचच प्रतिक्रिया देणे योग्य नाही. यावर अभ्यास केल्यानंतर बोलणे योग्य राहील. मात्र, औवेसींनी तसे केले असेल तर ते अजिबात योग्य नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, छत्रपतींच्या भूमीत असे करणे योग्य नाही असे मत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
खासदार संभाजी राजे वैयक्तिक दौ-यासाठी नाशिक येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्रकारांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
यावेळी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण्यासाठी दिर्घकालीन नियोजन (लॉन्ग र्टम प्लॅनिंग) करणे आवश्यक असल्याचे राजे म्हणाले. मे अखेर किंवा जून मध्ये दुष्काळ निवारण संदर्भात महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची माहिती यावेळी संभाजीराजे यांनी दिली.