

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL KKR : आयपीएल 2022 मध्ये नशिबाच्या जोरावर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी कमिन्स आयपीएल संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला परतणार असून तो मायदेशात स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाला जून आणि जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधारही आहे.
पॅट कमिन्सची यंदाची कामगिरी कोलकातासाठी काही खास नव्हती. त्याने जोरदार फटकेबाजी करत एक सामना जिंकून दिला होता, पण गोलंदाजी करताना त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता पाठीच्या दुखापतीमुळे तो निर्णायक वेळी संघाची साथ सोडून संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. (IPL KKR)
पॅट कमिन्सला कोलकाता संघाने मेगा लिलावात ७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. कमिन्सने सुरुवातीच्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले, परंतु गोलंदाजीत त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यानंतर त्याला काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले. संघात पुनरागमन करताना, कमिन्सने चेंडूसह आश्चर्यकारक कामगिरी केली आणि कोलकाताच्या विजयात योगदान दिले. या मोसमात त्याने पाच सामन्यांत २६२.५० च्या स्ट्राईक रेटने ६३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने १९.५ षटकात सात विकेट्स घेतल्या आहेत.(IPL KKR)
आयपीएलदरम्यान कमिन्सला स्नायूंची दुखापत झाली होती. यातून सावरायला त्याला जास्त वेळ लागणार नसला तरी श्रीलंका दौऱ्यापूर्वी तो सिडनीला येऊन विश्रांती घेईल. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नसल्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मात्र, तो एकदिवसीय आणि कसोटीत संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.