MI vs CSK : मुंबईचा विजय ‘तिलक’ | पुढारी

MI vs CSK : मुंबईचा विजय ‘तिलक’

मुंबई ; वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI vs CSK) संघाने गुरुवारी चेन्‍नई सुपर किंग्जवर 5 गडी आणि 30 चेंडू राखून सफाईदार विजय मिळवला. त्यामुळे चेन्‍नईच्या उरल्यासुरल्या आशांवरही आता पाणी फेरले गेले आहे. नाबाद 34 धावा केलेला तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

चेन्‍नईप्रमाणेच मुंबईची सुरुवातही सनसनाटी झाली. 98 धावांचे लक्ष्य त्यांच्यापुढे विजयासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, हे सोपे लक्ष्य पार करतानाही मुंबईची दमछाक झाली. सलामीवीर ईशान किशन सहा धावा करून तंबूत परतला. कर्णधार रोहित शर्माने 18 धावांची खेळी केली. त्यानंतर मुकेश चौधरीने लागोपाठच्या चेंडूंवर डॅनियल सॅम्स आणि टिस्टन स्टॅब्स यांना तंबूत पाठवले. त्यामुळे मुंबईची अवस्था 4 बाद 33 अशी बनली. त्यानंतर वैयक्‍तिक 18 धावांवर ऋतिक शोकीन मोईन अलीच्या मार्‍यावर त्रिफळाबाद झाला.

अखेर तिलक वर्माने नाबाद धावा करून टिम डेव्हिडच्या (7 चेंडूंत 2 षटकारांसह 16 धावा) साथीत संयमी खेळ करून मुंबई संघाची नय्या पार केली. मुंबईकडून मुकेश चौधरीने 23 धावांत 3 बळी घेतले. तसेच मोईन अली आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला. मुंबईचे आता बारा सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. चेन्‍नईचे मात्र बारा सामन्यांतून आठ गुण झाले असून गुरुवारी त्यांना आठव्यांदा हार पत्करावी लागली. (MI vs CSK)

त्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून चेन्‍नईला फलंदाजी दिली. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. चेन्‍नईचा सगळा संघ फक्‍त 97 धावांत आणि 24 चेंडू बाकी असताना गारद झाला. चेन्‍नईची सुरुवात अशी धक्‍कादायक झाली की, खुद्द महेंद्रसिंग धोनीनेही त्याची कल्पना केली नसेल. डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ या त्रिकुटाने चेन्‍नईची अवस्था 6 बाद 39 अशी दयनीय केली. सॅम्सने चेन्‍नईला लागोपाठ तीन दणके दिले. सुरुवातीला त्याने डेव्हॉन कॉन्वे, पाठोपाठ मोईन अली आणि मग सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना तंबूत पाठवले. त्या आधी बुम बुम बुमराहने रॉबिन उथप्पा याला पायचीतच्या सापळ्यात पकडले.

पाठोपाठ अंबाती रायुडू याला मेरेडिथने ईशान किशनच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. रायुडूने 10 धावा केल्या. भरवशाचा शिवम दुबे हाही मेरेडिथचा बळी ठरला. यावेळीदेखील झेल टिपला तो ईशान किशनने. दुबेने 10 धावा करून तंबूचा रस्ता धरला. मग कर्णधार धोनी आणि ड्वेन ब्राव्हो ही जोडी जमली. त्यांनी हळूहळू धावा जमवायला सुरुवात करून संघाला अडचणीतून बाहेर काढले.

मात्र, जम बसत चाललेला ब्राव्हो हा कुमार कार्तिकेयचा बळी ठरला. उंचावरून फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तिलक वर्माने ही भेट आनंदाने स्वीकारली. ब्राव्होने 12 धावा केल्या. पाठोपाठ समरजित सिंग यालाही कार्तिकेयने पायचीत पकडले. धोनीने 33 चेंडूंत नाबाद 36 धावांची खेळी केली. 4 चौकार व 2 षटकार हे त्याचे मुख्य फटके ठरले. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने 3, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी2 तर जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 मोहरा टिपला.

नकोसा विक्रम टळला (MI vs CSK)

यापूर्वी चेन्‍नईने 2013 मधील आयपीएल हंगामात मुंबईविरुद्ध सर्वबाद 79 धावा केल्या होत्या. तसेच 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्‍नईला 109 धावांत उखडले होते. गुरुवारच्या लढतीत चेन्‍नईने नीचांकी धावसंख्या टाळली. नीचांकी धावांचा विक्रम आयपीएलमध्ये बेंगलोरच्या नावावर आहे. 2017 साली त्यांचा सगळा संघ कोलकाताविरुद्ध केवळ 49 धावांत तंबूत परतला होता.

Back to top button