कुस्ती आखाड्याचे संवर्धन | पुढारी

कुस्ती आखाड्याचे संवर्धन

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळी (लक्ष्मीविलास पॅलेस) असलेल्या कुस्ती आखाड्याचे संवर्धन सुरू आहे. आखाड्यात शाहूकालीन व्यायामाचे साहित्य, त्याचबरोबर कुस्तीची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येत आहेत.

26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे शाहू महाराज यांचा जन्म झाला. जन्मगृहालगतच्या दालनात कुस्तीचा आखाडा होता. शाहू महाराज छत्रपती घराण्यात दत्तक जाण्यापूर्वी याच आखाड्यात व्यायामाबरोबरच कुस्तीचे धडे घेत होते.
सन 2019 व त्यानंतर सन 2021 असा तीन वर्षांत दोनवेळा महापूर आला. जन्मस्थळाच्या इमारतीत महापुराचे पाणी शिरले. यामध्ये आखाड्यातही पाणी होते. सध्या आखाड्याचे संवर्धन सुरू आहे. शाहू महाराजांच्या काळात व्यायामासाठी वापरत असलेल्या साहित्याची निर्मिती करण्यात येत आहे. आखाड्याच्या भिंतीवर शाहूकालीन काही छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत, याबरोबरच शाहू महाराज कुस्ती पाहत असलेले छायाचित्रही आखाड्याच्या भिंतीवर प्रदर्शित करण्यात येणारआहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंना राजाश्रय दिला. शाहू महाराजांच्या काळात जे नामांकित मल्‍ल होऊन गेले, अशा राजाश्रय मिळालेल्या मल्‍लांची छायाचित्रेही लगतच्या दालनामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Back to top button