‘ऑनलाईन शिक्षण प्रभावी, पण सवय नको’ | पुढारी

'ऑनलाईन शिक्षण प्रभावी, पण सवय नको'

कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पण, ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला ‘ब्रेक’ लागणार नाही, हे महत्वाचे. कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे काही काळापुरते योग्य आहे. मात्र, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा किंवा महाविद्यालयीन जीवन अनुभवण्याची संधी ऑनलाईन शिक्षणात काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती आहे. कोरोना काळात घरी बसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. ऑनलाईनच्या माध्यमातून आधुनिकतेकडे होणारी वाटचाल योग्य आहे. पण, आपण पारंपरिक शिक्षण काळोखात ढकलू शकणार नाही. कारण त्यातून  विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. 

व्यवहारिक ज्ञान म्हणा किंवा आणखी खूप काही शिकण्याची उमेद पारंपरिक शिक्षणातून पूर्ण होऊ शकते. तरीही ऑनलाईन शिक्षणाला विरोध नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे, हे विसरून चालणार नाही. पण यातून परिश्रम घेऊन संशोधन करण्याची विद्यार्थ्यांची सवय मोडायला नको. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे वेड विद्यार्थ्यांना लागायला नको. काही काळापर्यंत किंवा एखादी न मिळणारी माहिती शोधण्यासाठी ऑनलाईन शिक्षण योग्य आहे. पण, कायमस्वरूपी या शिक्षणातून विद्यार्थी परिपूर्ण होणे कठीण आहे. जगाला एकत्र आणि जलदगतीने पुढे नेण्याची क्षमता फक्त ऑनलाईन प्रकियेतच आहे. याचे विधायक चित्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीत दिसत आहे. ‘वेळ कमी आणि काम जास्त’ अशी परिस्थिती सर्वांची झालेली आहे. कामाला गती देण्यासाठी ‘स्मार्ट’ ऑनलाईन शिक्षणाची जोड मिळाल्यास याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. 

कोरोना काळात अनेकांना फटका बसला आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि अभ्यासक्रमावर जास्तच परिणाम झालाय. सध्याच्या काळ लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण योग्यच आहे. पण, ऑनलाईन शिक्षण फारसे प्रभावी ठरणारे नाही. कारण, त्यात शिक्षक आणि विद्यार्थी ही घट्ट असलेली वीण कुठेतरी नाहीशी झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध होत नाही. त्यातून आयुष्यात उपयोगी येणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकण्यापासून विद्यार्थ्यांना मुकावे लागेल. घरी बसून ऑनलाईन शिक्षणाने डोळ्यांच्या आजाराचेही प्रमाण वाढू शकते. परिणामी, सर्वच बाबींचा विचार केल्यास सध्या कोरोना काळ असल्याने ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे. ऑनलाईन शिक्षण नको, असे म्हणणे नाही. परंतु, इतके पण ऑनलाईन शिक्षणाच्या पाठीमागे लागू नका की, पुस्तके वाचण्याची संस्कृती लोप पावेल आणि सोनेरी पानाने लिखित असलेला इतिहास पुसला जाण्याची शक्यता निर्माण होईल.

नाव : मंगेश दाढे (विद्यार्थी)

मोबाईल क्रमांक : 9075203768

ई-मेल : mangeshdadhe@gmail.com

Back to top button