राज ठाकरे यांच्या पुढे पोलिसांचा अडथळा; पाचपेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी एकत्र येण्यास मनाई | पुढारी

राज ठाकरे यांच्या पुढे पोलिसांचा अडथळा; पाचपेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी एकत्र येण्यास मनाई

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील 1 मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेपुढे आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे पोलिस परवानगीबाबत निर्णय झालेला नाही आणि दुसरीकडे पाचपेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी एकत्र येण्यास मनाईचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी (दि. 26) जारी केला आहे. त्यामुळे आता विनापरवानगी सभेच्या हालचाली करणाऱ्या मनसेला औरंगाबाद पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात पकडले आहे.

पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी आदेशात म्हटले की, औरंगाबादेत विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांतर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच इतर विषयांच्या संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पुढील काळात जयंती-उत्सव होत आहेत. तर मनसेने मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला आहे. आणि याला विरोध दर्शवत वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाचा विषयही सातत्याने समोर येत आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरण सतत डोकेवर काढते आहे. तसेच, औरंगाबाद हे संवेदनशील शहर असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे जरुरी वाटल्याने पोलिस आयुक्तांनी हा आदेश काढला आहे. शस्त्रे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणारी अशी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची बाळगू नये तसेच जमा करू नये किंवा ते तयार करता येणार नाही. तर विनापरवानगी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

औरंगाबादेत जमावबंदी नाही : पोलिस आयुक्त

औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु औरंगाबादेत कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही, असे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की जमावबंदी ही कलम १४४ अन्वये लागू होते. आम्ही कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश काढले आहेत. असा आदेश वर्षभर अनेकदा काढला जातो. सण-उत्सवांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सभा आणि वर्तनाचे नियमन करण्याचा अधिकार पोलिसांना या कमलान्वये प्राप्त होतो. हा आदेश निघाल्यानंतर परवानगी घेऊनच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येते. याचा अर्थ जमावबंदी असा होत नाही. तसेच, याचा मनसेच्या सभेशी संबंध जोडणेदेखील चूक आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले.

मंडप, खुर्च्या, साउंड होऊ शकते जप्त

पोलिस आयुक्तांच्या 37 (1) व (3) आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच, विनापरवानगी सभा घेतल्यास कलम 131 व 134 नुसार पोलिसांना सभास्थळावरील मंडप, खुर्च्या, साउंड व इतर साहित्य जप्त करण्याचे अधिकार प्राप्त होतात, अशी माहिती कायद्याचे अभ्यासक माजी सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली. दरम्यान, मनसेने विनापरवानगी सभा घेतल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच पोलिस मंडप, खुर्च्या, साउंड व इतर साहित्य जप्त करू शकतात.

 

Back to top button