रेणू शर्मा आहे हनी ट्रॅपर ? | पुढारी

रेणू शर्मा आहे हनी ट्रॅपर ?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्र्रसचे नेते धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी मागणारी रेणू शर्मा हिच्याबाबत गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कथित हनी ट्रॅपर असलेल्या रेणू शर्मा हिने अशाप्रकारे अनेकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी असल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. त्यामुळेच तिच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेतील कक्ष-2 च्या पथकाकडून सुरू आहे. रेणू शर्मा हिच्यावर पाच कोटी रुपयांसह महागड्या गिफ्टची मागणी केल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेने इंदूर पोलिसांच्या मदतीने रेणू शर्मा हिला मध्य प्रदेशमधील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने रेणू शर्माला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

करुणा शर्मा यांची बहीण असलेल्या रेणू शर्माने गायिका असल्याचे सांगत यापूर्वी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असून, त्याबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल असल्याचे समजते. रेणू शर्मा हिने या पद्धतीने उकळलेल्या पैशांतून महागडे मोबाईल्स आणि अन्य मौल्यवान वस्तू घेतल्याचेही पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. दरम्यान, अशा प्रकारची आणखी एक तक्रार गुन्हे शाखेकडे दाखल झाली असून, येत्या काळात आणखी काही तक्रारी येणार असल्याचे बोलले जाते.

Back to top button