महाराष्ट्र भ्रमंती सुरु होताच सदावर्तेंना उपरती ! एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे परत देण्याची दाखवली तयारी | पुढारी

महाराष्ट्र भ्रमंती सुरु होताच सदावर्तेंना उपरती ! एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे परत देण्याची दाखवली तयारी

अकोला : पुढारी वृत्तसेवा : गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी अकोट येथे सुनावणी झाली. या दरम्यान अकाटे आगारातील एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करण्यास गुणरत्ने सदावर्ते तयार असल्याचे त्यांच्या वकिलानी सांगितले. यावेळी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून न्यायालयाने याप्रकरणी २२ एप्रिलरोजी निकाल देण्यात येईल, असे सांगितले.

भंडारा : पत्नीचा सासरी येण्यास नकार, तर पतीचा केला पत्नी आणि सासूवर चाकूहल्ला

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील पोलिसांकडून गुणरत्न सदावर्ते यांची चौकशीसाठी मागणी होत असताना अकोट पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट न्यायालयात दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी बुधवारी अर्जावर सुनावणी घेतली.

या सुनावणी दरम्यान ॲड. मुन्ना खान यांनी सदावर्ते दांपत्याची तर ॲड. अजित देशमुख यानी सरकार पक्षाची बाजू मांडली. आपल्या युक्तिवादात मुन्ना खान यांनी पैसे घेतल्याचे मान्य केले. परंतु हे पैसे फसवणूक नसुन ही वकील फी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही याप्रकरणी काही आक्षेप असल्यास अकोट आगारातील कर्मचा-यांकडून घेतलेले पैसे आपण परत करण्यास तयार असल्याचे मून्ना खान यांनी सदावर्ते यांच्यावतीने सांगितले.

तरी गुन्हा रद्द होत नाही

सदावर्ते यांच्या वकिलाने पैसे परत देण्याची कबुली दिली असली, तरी सरकारी विधिज्ञ अजित देशमुख यांनी फसवणुकीने घेतलेले पैसे परत केल्याने गुन्हा नष्ट होत नसल्याचे सांगितले. त्यांनी या गुन्ह्याचे गांभिर्य, त्याची व्याप्ती, त्याचे अनिष्ट परिणामांची न्यायालयाला विस्तृत माहिती दिली. सदावर्ते दांपत्याच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करुन त्यांनी आपले कथनाचे पुष्ट्यर्थ सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्वाळेही न्यायालयात सादर केले.

२२ एप्रिलला अंतिम सुनावणी

दोन्ही बाजू न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी ऐकून घेतल्या. या प्रकरणी २२ एप्रिलरोजी निकाल दिला जाईल, असे न्यायाधिशांनी सांगितले. मात्र, तोवर सदावर्ते दांपत्याच्या अटकेबाबत त्यांनी दुसरा कोणताही अतिरिक्त आदेश दिला नाही. त्यामुळे २२ एप्रिलपूर्वी अकोट पोलीस सदावर्तेंना अटक करतात की २२ एप्रिलरोजी न्यायालय त्यांना अटकपूर्व जामीन देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button