भंडारा : पत्नीचा सासरी येण्यास नकार, तर पतीचा केला पत्नी आणि सासूवर चाकूहल्ला | पुढारी

भंडारा : पत्नीचा सासरी येण्यास नकार, तर पतीचा केला पत्नी आणि सासूवर चाकूहल्ला

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा जिल्‍हातील पवनी तालुक्यातील पाथरी येथे पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन तिच्यावर चाकुने हल्ला केला. तर तिच्या बचावासाठी आलेल्या सासूवरही चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.19) घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अक्षय कल्याणसिंग राजपूत (वय २४) रा. पारडी, नागपूर असे पतीचे नाव आहे. पाथरी येथील सत्यशिलासोबत अक्षयचा विवाह झाला आहे. परंतु, काही कारणांमुळे पत्नी सत्यशिला ही सासरी जात नव्हती. त्यामुळे दोघेही पतीपत्नीमध्ये वाद होत होते. याच कारणामुळे त्यांच्यात पटतही नव्हते.

दरम्यान, मंगळवारी (दि.१९) अक्षयने सत्यशिलाला फोन करुन घरी बोलावले. आणि मी तुला घ्यायला येतो असे ही तो म्हणाला. परंतु, सत्यशिलाने सासरी येण्यास नकार दिला. तर अक्षय हा पाथरी येथे आला. पत्नी सासरी येत नाही, या कारणामुळे तो संतापला होता. त्याने आपल्यासोबत चाकुसारखा धारदार शस्त्र सोबत आणले होते. घरी येताच त्याने सत्यशिलाच्या नाकावर, हातावर व कमरेवर चाकुने वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्यशिला रक्तबंबाळ होऊन जखमी झाली. तिने आरडाओरड केल्याने सत्यशिलाची आई रुकमा पडोळे यांनी अक्षयला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्‍यावेळी अक्षयने तिच्यावरही चाकुने हल्ला करुन जखमी केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

सत्यशिलाच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिस ठाण्यात अक्षय राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button