बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत तब्‍बल १०९ टक्क्यांची वाढ | पुढारी

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत तब्‍बल १०९ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : गैर बासमती तांदळाच्या निर्यातीत गेल्‍या सात वर्षाच्या कालावधीत 109 टक्क्यांची वाढ झाली आहे. अशी माहिती उद्योग आणि व्यापार मंत्रालयाकडून बुधवारी (दि.20) देण्यात आली. वर्ष 2013-14 मध्ये 2.92 दशलक्ष टन इतक्या गैर बासमती तांदळाची निर्यात झाली होती. त्या तुलनेत गेल्‍या आर्थिक वर्षात ही निर्यात 6.11 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली आहे. गतवर्षी जगभरातील दीडशेपेक्षा जास्त देशांना भारतामधून तांदळाची निर्यात केली आहे.

तांदूळ निर्यातीच्या या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी सोशल मीडीयावरुन याबाबत प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांचा माल जागतिक बाजारात जाऊ लागला असून त्यामुळे खाद्य सुरक्षा सुनिश्चित होत आहे, असे मंत्री पियूष गोयल म्‍हणाले.

भारतातून वर्ष 2019-20 मध्ये 2.01 अब्ज डॉलर्सच्या गैर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. त्या तुलनेत 2020-21 मध्ये हा आकडा 4.8 अब्ज डॉलर्सवर गेला आहे तर 2021-22 मध्ये 6.11 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. आफ्रिका खंडाचा विचार केला तर पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाला मोठ्या प्रमाणात गैर बासमती तांदळाची निर्यात केली जात आहे.

याशिवाय नेपाळ, चीन, कोटेडी आयवर, टोगो, सेनेगल, गिनी, व्हिएतनाम, जिबुती, मादागास्कर, कॅमेरुन, सोमालिया, मलेशिया, लायबेरिया आदी देशांना गैर बासमती तांदळाची निर्यात सुरू आहे. आगामी काळात तांदूळ निर्यातीला मोठा वाव असल्याचे अपेडाचे चेअरमन एम. अंगमुथू यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button