महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र जून अखेरच | पुढारी

महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र जून अखेरच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या ऑफलाईन शिक्षण सुरु झाले असले तरी कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणामुळे ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे वेळापत्रक पुढे गेल्यामुळे दुसरे शैक्षणिक सत्र जून अखेरीला संपणार आहे. त्यामुळे मे महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीतही महाविद्यालये सुरुच राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दरवर्षीचे उन्हाळी सुट्टीतील नियोजन यंदा मात्र कोलमडणार आहे.

दरवर्षीचे शाळा महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिल अखेरपर्यंत असते. 1 मेला निकाल लागला की साधारण 12 जून अखेर उन्हाळी सुट्ट्या लागतात. त्यामुळे बरेचशे कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन जाणीवपूर्वक उन्हाळी सुट्टीतच केले जाते. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने सहकुटुंब कार्यक्रमाचा आनंद लुटता यावा हाच उद्देश त्यामागचा असतो. नातलगांचे लग्न समारंभ, यात्रा-जत्रांना उपस्थित राहत सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत असतात. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन सुरु होते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली होती. हे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यावर शासनाने भर दिला आहे. त्यामुळेच चालू शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे नियोजन ऑगस्ट ते जून अखेर असे पुढे ढकलण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवल्यामुळे तसेच शाळांचे शैक्षणिक नियोजन पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्ण होत आल्याने शासनाने त्यांचे शैक्षणिक वर्षातील कामकाज 1 मेअखेर पर्यंत उरकले असून दि. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी जाहिर केली आहे. मात्र महाविद्यालयाचे दुसर्‍या सत्रातील कामकाज नुकतेच मार्चपासून सुरु झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष जूनअखेरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर लगेचच 5 जुलैला पुढील शैक्षणिक वर्षातील कामकाज सुरु होणार आहे. भर उन्हाळ्यात मे महिन्यात जिल्ह्यासह राज्यातील सर्व महाविद्यालये सुरु राहणार आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये मेअखेरीस वार्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. कोरोना काळातील सुट्ट्या भरुन काढण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या मिळणार नाहीत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उन्हाळी सुट्टीचे नियोजन कोलमडणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोनाकाळातील सुट्ट्या भरुन काढण्यासाठीच उन्हाळ्यातही महाविद्यालयीन कामकाज सुरु ठेवले आहे.
-शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य, सावित्रीबाई फुले महिला कॉलेज, सातारा

Back to top button