सीबीआयची मोठी कारवाई, कर्जबुडव्या नीरव मोदीचा मित्र सुभाष शंकरला अटक, इजिप्तमधून भारतात आणलं! | पुढारी

सीबीआयची मोठी कारवाई, कर्जबुडव्या नीरव मोदीचा मित्र सुभाष शंकरला अटक, इजिप्तमधून भारतात आणलं!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

सीबीआयनं इजिप्तच्या कैरोमध्ये मोठी कारवाई केली आहे. बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर याला इजिप्तमधील कैरोमध्ये पकडण्यात आले आहे. त्याला इजिप्तमधून मुंबईत आणण्यात सीबीआयला यश आले आहे. नीरव मोदीशी संबंधित पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुभाष हा नीरव मोदीच्या एका कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करत होता.

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ४०० कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह भारतातून पसार झाले होते. पीएनबी बँक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरून २०१८ मध्ये इंटरपोलने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष शंकर याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआयने मुंबईतील एका विशेष न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे इंटरपोलने चार वर्षांपूर्वी रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली होती.

कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदीची तब्बल १ हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने याआधी जप्त केली आहे. यात काळाघोडा येथील आयकॉनिक रिदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपीयन्सी रोड येथील फ्लॅट, कुर्ल्यातील कार्यालयीन इमारत आणि दागिने यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार लीलावासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने लिक्वीडेटरची नियुक्ती केली होती.

ईडीने काही मालमत्तांचा यापूर्वीच लिलाव केला असून उर्वरित मालमत्ता लिलावासाठी बँकेला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील एका सौरऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. दरम्यान, ईडीने मोदीच्या महागड्या गाड्या, पेंटिंग्स तसेच इतर महागड्या वस्तूंचा लिलाव करून यापूर्वी वसूल केलेले 6 हजार कोटी रुपये पीएनबी बँकेला सुपूर्द केले आहेत.

Back to top button