आंदोलन घडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्‍न सुरू; धनंजय मुंडेंचा आरोप | पुढारी

आंदोलन घडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्‍न सुरू; धनंजय मुंडेंचा आरोप

मुंबई, पुढारी ऑनलाईन: एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेने मोर्चा वळवला. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली. त्याचबरोबर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनाकडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस कमी असल्याने आंदोलक थेट बंगल्याबाहेर पोहचले. आंदोलकांकडून चप्पलांसह दगड भिरकवण्यात आले.

धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्‍हणाले, काही जणांकडून हे आंदोलन घडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्‍न सुरू आहे.  मोठ्या प्रमाणात कर्मचारी या आंदोलनत सहभागी होते, त्‍यामूळे पूर्वनियोजित हा हल्‍ला होता. काल न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान येथे जल्‍लोष केला होता. आणि आज काही नेत्‍यांनी ठरवून आमच्या नेत्‍यांच्या घरावर आंदोलन केले. यातून सरकार अस्‍थिर करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे, असे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच शरद पवारांच्या घरावर आंदोलन करणे हे एक षड्यंत्र आहे. असे मुंडे म्‍हणाले.

एस टी कर्मचा-यांना आवाहन

दरम्‍यान, एस टी कर्मचा-यांना मी विनंती करतो, कोणीही षड्यं‌त्राला बळी पडू नये. आम्‍ही सर्वजण चर्चेला येण्यास तयार आहोत, असे मुंडे म्‍हणाले.

आम्ही चर्चा करण्यास तयार; सुप्रिया सुळे

एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी तयारी दर्शवली आहे. सुळे म्हणाल्या की, “मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते. कारण, माझ्या घरावर अचानक हल्ला झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. मी हात जोडून सर्वांना विनम्रपणे विनंती आहे की, माझी आणि आमच्या नेत्यांची चर्चेला तयार आहे. जी काही चर्चा करायची आहे, ती शांततेच्या मार्गाने व्हावी, इतकीच अपेक्षा आहे.”

“माझ्या घरावर अचानक झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. माझ्या घरातील लोकांना पहिल्यांदा सावरावं लागेल. जर प्रश्न सोडवायचे असतील, तर शांततेच विचार आणि चर्चा करून सोडवावे लागलीत. असे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली.

अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा प्रकार : संजय राऊत

दरम्यान, झाल्या प्रकारानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा असल्याचे म्हणाले. अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी सर्व चर्चा केल्या आहेत, न्यायालयानेही निर्णय दिला आहे. असे असतानाही पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, महाविकास आघाडी सरकार डोळ्यात खुपत असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button