China Covid : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! शांघायमध्ये युद्धपातळीवर चाचणी मोहीम, पाठवले हजारो सैन्य, डॉक्टर्स | पुढारी

China Covid : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! शांघायमध्ये युद्धपातळीवर चाचणी मोहीम, पाठवले हजारो सैन्य, डॉक्टर्स

शांघाय; पुढारी ऑनलाईन

चीनमधील (China) आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये (Shanghai) कोरोनाचा (Covid) उद्रेक झाला आहे. रविवारी येथे ८ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर चीनने सोमवारी २ कोटी ६० लाख लोकांची चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये सैन्य आणि हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईतील चीनमधील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी मोहीम आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मी (The People’s Liberation Army) ने रविवारी सैन्य, नौदल आणि संयुक्त लॉजिस्टिक सपोर्ट फोर्समधून भरती केलेल्या २ हजारहून अधिक वैद्यकीय कर्मचार्‍यांना शांघायला पाठवले आहे, असे वृत्त सशस्त्र दलाच्या एका वृत्तपत्राने दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिआंग्सू, झेजियांग आणि बीजिंग यासारख्या अनेक प्रांतांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचार्‍यांना शांघायला पाठवले आहे. शांघायला पाठवण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १० हजारांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

चीनमधील (China Covid) वुहानमध्ये पहिल्यांदा २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर जगभरात कोरोना पसरला. या पार्श्वभूमीवर शाघांयला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी चीन सरकारने मोठी मोहीम राबवली आहे. शाघांयमध्ये दोन टप्प्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. आता येथे nucleic acid चाचणी केली जात आहे.

चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे २५ दशलक्ष लोकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून संसर्ग नियंत्रित करता येईल. शिपिंग दिग्गज मार्सकने शुक्रवारी सांगितले की, शहरातील काही डेपो बंद आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रकसेवा आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ऊर्जेची गरज असते तेव्हा शिवतांडव स्तोत्र म्हणते :अमृता फडणवीस |Shivtandav stotra | Amruta Fadanvis

Back to top button