सातारा: झेडपीवर आता सिसीटिव्हीचा वॉच | पुढारी

सातारा: झेडपीवर आता सिसीटिव्हीचा वॉच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेवर आता सिसीटिव्हीचा वॉच राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागासह पाठीमागील इमारतीच्या चारही बाजूला सिसीटिव्हीची करडी नजर राहणार आहे. या अत्याधुनिक कॅमेर्‍यामुळे बारीक सारीक गोष्टी टिपल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कार्यालय परिसरातून अनेकदा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे कार्यालय परिसरात कॅमेरे बसवण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रशासनामार्फत ठरावीक ठिकाणीच सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र हे कॅमेरे जुने असल्या कारणाने काही कॅमेरे बिघडले होते.

तसेच जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात असलेल्या कॅमेर्‍याला एका ट्रकची धडक बसल्याने हा कॅमेरा गेल्या काही दिवसापासून बंद पडला होता.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वच परिसरात अत्याधुनिक सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्हा परिषदेच्या सर्व मजल्यावरील पॅसेजमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय मुख्य प्रवेशद्वार परिसर, विस्तारीत इमारत परिसर, पार्कींग, जि. प. विश्रामगृह यासह अन्य परिसरात सुमारे 30 हून अधिक अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येत आहेत. तसेच जुने 10 कॅमेरे असे मिळून 40 हून अधिक सिसीटिव्ही कॅमेर्‍याचा वॉच जिल्हा परिषदेवर राहणार आहे. या सर्व कॅमेर्‍याची स्क्रीन चौथ्या मजल्यावर राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या दालनातही कॅमेर्‍याची स्क्रीन राहणार आहे. त्यामुळे सर्वच परिसरात सिसीटिव्हीचा वॉच राहणार आहे.

परिसरात घडणार्‍या बारीक सारीक घटना यामध्ये कैद होणार आहेत. तसेच दुचाकी चोरीलाही आळा बसणार आहे. सिसीटिव्ही कॅमेर्‍यासाठी लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Back to top button