Sri Lanka Economic Crisis : एक कप चहा १०० रुपये, बटाटे २०० रुपये किलो; श्रीलंका का गेला आर्थिक रसातळाला? | पुढारी

Sri Lanka Economic Crisis : एक कप चहा १०० रुपये, बटाटे २०० रुपये किलो; श्रीलंका का गेला आर्थिक रसातळाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या दक्षिणेकडील शेजारी श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे (Sri Lanka Economic Crisis). येथे महागाईचा दर १७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. १ कप चहाचा दरही १०० रुपयांवर पोहोचला आहे. ब्रेडच्या एका पॅकेटसाठी १५० श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेतील महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया कमकुवत होणे हे देखील आहे. मार्च महिन्यातच श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी घसरले आहे. मार्चमध्येच, १ डॉलरचे मूल्य २०१ श्रीलंकन ​​रुपयांवरून २९५ श्रीलंकन ​​रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे श्रीलंकेत महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.

परकीय चलन साठा जवळजवळ संपुष्टात (Sri Lanka Economic Crisis)

श्रीलंकेकडील परकीय चलन साठा जवळजवळ संपुष्टात आला आहे. त्यातच कर्जाचा प्रचंड बोजा यामुळे दिवाळखोरीने उंब-यावर पाय ठेवला आहे. डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. डिझेल-पेट्रोल, गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की साखरेचा भाव २९० रुपये किलो आणि तांदूळ ५०० रुपये किलो झाला आहे. तर बुधवारपासून १० तासांची वीज कपात सुरू झाली आहे. लोकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणा-या मेणबत्त्याही महाग झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू ४ पटीने महाग झाल्या आहेत. अशा स्थितीत जनतेचा रोष रस्त्यावर उफाळून येत आहे.

२०१९ मध्ये, श्रीलंका सरकारने भरीव कर कपातीची घोषणा केली ज्यामुळे त्याचा महसूल कमी झाला. चीनसोबतच्या कर्जाच्या व्यवस्थेनेही या संकटाला हातभार लावला. गेल्या दशकात 5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त चिनी कर्जे बंदरे, विमानतळ आणि कोळसा ऊर्जा प्रकल्प यासारख्या कमी परताव्याच्या प्रकल्पांसाठी गेली. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत अनेक वर्षांपासून संरचनात्मक समस्या आहेत. त्यांच्या सरकारने समस्या सोडवण्यासाठी शॉर्टकट घेतला. उदाहरणार्थ, गेल्या १५ वर्षांतील प्रत्येक सरकारने परतफेडीची तरतूद न करता सार्वभौम रोखे जारी केले. त्यांचा परकीय चलनाचा साठा वाढला परंतु वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमुळे नव्हे तर परकीय चलने कर्ज घेतल्याने. यामुळे त्यांचे परकीय चलन बाजारातील धक्क्यांपासून असुरक्षित राहिले. (Sri Lanka Economic Crisis)

कोविड-१९ महामारीच्या काळात श्रीलंकेच्या परकीय रेमिटन्समध्ये घट झाली आणि परकीय चलन वाढवणारे पर्यटन क्षेत्र व्यावहारिकदृष्ट्या कोसळले. श्रीलंकेसाठी पर्यटन क्षेत्र सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक आहे. परंतु २०१७ मध्ये इस्टर बॉम्बस्फोटानंतर या क्षेत्राला मोठा फटका बसला. हे क्षेत्र सावरण्यापूर्वेच २०२० च्या सुरुवातीपासून कोविड-१९ साथीच्या रोगाने जगाला मोठा फटका बसला. श्रीलंकाही त्याला अपवाद राहिला नाही.

जेव्हा कोविड-संबंधित निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली तेव्हा रशिया आणि युक्रेनमधून श्रीलंकेत येणा-या पर्यटकांचा ओघ मोठा होता. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत याचे प्रमाण सुमारे २५ टक्के होते. पण रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्ध छेडले. परिणामी जगभरातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध घोषीत केले. याचाही विपरीत परिणाम श्रीलंकेवर झाला. त्यातच त्यांचे पारंपरिक पर्यटन स्रोत असणा-या भारत, चीन, यूके आणि जर्मनी या देशातील पर्यटकांनी अजूनही कोविडच्या कारणामुळे पर्यटनाकडे पाठकरून आहेत. त्यामुळे तर आणखीनच धक्का बसला आहे. कोविड-१९ साथीच्या रोगाने जगण्यातील, अर्थवस्थेतील असुरक्षितता उघड केली आणि श्रीलंकेला अशा परिस्थितीत आणले की या आर्थिक गोंधळातून कसे बाहेर पडायचे याबद्दल अजूनही अस्पष्टता दिसते आहे. (Sri Lanka Economic Crisis)

पेट्रोलपेक्षाही दूध महाग.. (Sri Lanka Economic Crisis)

गेल्या वर्षी ३० ऑगस्ट रोजी, श्रीलंका सरकारने चलन मूल्यात तीव्र घसरण आणि त्यानंतर अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली. या संदर्भात नुकत्याच एका अहवालात देशातील महागाईची आकडेवारी मांडण्यात आली होती. जानेवारीतील या अहवालात असे सांगण्यात आले होते की नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या एका महिन्यात श्रीलंकेत अन्नधान्य महागाई १५ टक्क्यांनी वाढली होती. यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली याचा अंदाज यावरून लावता येतो. सध्या श्रीलंकेत एक किलो मिरचीचा भाव ७१० रुपयांवर गेला आहे. एकाच महिन्यात मिरचीचे भाव २८७ टक्क्यांनी वाढले आहेत. एवढेच नाही तर वांग्याचे भाव ५१ टक्क्यांनी वाढले, तर कांद्याचे भाव ४० टक्क्यांनी वाढले. एक किलो बटाट्यासाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. एवढेच नाही तर एक लिटर पेट्रोल २५४, डिझेल १७६ रुपये आणि दूध २६३ रुपयांना विकले जात आहे. तर दुधाची पावडर १,९७५ रुपये प्रति किलो, तर एलपीजी सिलेंडरची किंमत ४,११९ रुपये आहे.

पॅरासिटामोलच्या १० गोळ्या ४५० रुपयांना..

पॅरासिटामॉलच्या १० ते १२ गोळ्यांसाठी ४२० ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत. तर अनेक औषधे अजिबात उपलब्ध नाहीत. रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे नसल्यामुळे शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन्स होणे बंद झाले आहे.

श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य असे घसरले…

खरे तर, गेल्या काही दिवसांत श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४६ टक्क्यांहून अधिक घसरले आहे. मार्चमध्ये श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य किती घसरले आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो. १ डॉलरच्या तुलनेत २०१ वरून ३१८ श्रीलंकन ​​रुपयांवर आला आहे. इतर देशांशी तुलना केल्यास, १ डॉलरचे मूल्य अंदाजे ७६ भारतीय रुपये, १८२ पाकिस्तानी रुपये, १२१ नेपाळी रुपये, ४५ मॉरिशियन रुपये आणि १४,३४० इंडोनेशियन रुपये इतके आहे.

परकीय चलन साठा ३ वर्षात गायब

श्रीलंकेच्या चलन आणि अर्थव्यवस्थेच्या या दुर्दशेचे कारण प्रचंड कर्ज आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेत तीन वर्षांपूर्वी नवीन सरकार स्थापन झाले तेव्हा परकीय चलनाचा साठा ७.५ अब्ज डॉलर होता. त्यात झपाट्याने घट झाली आणि जुलै २०२१ मध्ये ती फक्त २.८ अब्ज डोलर इतकी कमी झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ते आणखी घसरून १.५८ अब्ज डॉलरपर्यंत घसरले आहेत. विदेशी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी श्रीलंकेकडे परकीय चलन साठाही शिल्लक नाही. आयएमएफ (IMF)ने नुकतेच सांगितले आहे की, श्रीलंकेची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यामुळे श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्यही कमी होत आहे.

श्रीलंकेच्या डोक्यावर इतका कर्जाचा बोजा..

आकडेवारीनुसार, श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलर्सचा कर्जाचा बोजा आहे. एकट्या चीनचे श्रीलंकेवर ५ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. याशिवाय, भारत आणि जपानसारख्या देशांव्यतिरिक्त, श्रीलंकेकडे IMF सारख्या संस्थांचे कर्ज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ पर्यंत, श्रीलंकेवर एकूण ३५ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज होते, जे आता ५१ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. आर्थिक संकटांनी वेढलेल्या या छोट्याशा देशावर या प्रचंड विदेशी कर्जाचे व्याज आणि हप्ते भरण्याचेही ओझे आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे.

Back to top button