पुणे : लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन पोलीस मित्रांच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

पुणे : लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन पोलीस मित्रांच्या मुसक्या आवळल्या

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स या नावाने आयडी बाळगणाऱ्या पोलीस मित्रांनी एका तरुणास एक लाखाचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती तरुणाने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्‍ये शनिवारी रात्री करण्‍यात आली. रोशन संतोष बागुल ( वय २२ ), गायत्री रोशन बागुल (वय २२ ), पूजा विलास माने ( वय २२, तिघे रा. देव इंद्रायणी सोसायटी, देहुगाव ) असे अटक केलेल्या तिघांची नांवे आहेत. याप्रकरणी विन्सेंट अलेक्झांडर जोसफ ( वय ५२, रा. चिखली ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोशन बागुल हा जोसफ यांच्याकडे एक लाखाची खंडणी मागून त्यांना त्रास देत होता. त्यानंतर जोसफ यांनी याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना सांगितली. त्यानुसार कृष्णप्रकाश यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी हॉटेल पुणे गेट येथे सापळा लावला. ५०० रुपयाची एक खरी नोट वरतीलावून त्याच्या आत मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाखाचा बंडल तयार केला. दरम्यान, पैसे घेण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली.  दोघे जण पसार झाले.

रोशन बागुल याने जमिनीचे व्यवहार करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले बनावट आयकार्ड मिळून आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button