व्यापारी संघटनांकडून भारत बंदची हाक; सरकारी बँका दोन दिवस बंद राहणार ! | पुढारी

व्यापारी संघटनांकडून भारत बंदची हाक; सरकारी बँका दोन दिवस बंद राहणार !

पुढारी ऑनलाईन डेस्क: ट्रेड युनियनने केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवस भारत बंदची हाक दिली आहे. बँक युनियनने देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारी बँकांचे खासगीकरण आणि बँकिंग कायदे अधिनियम 2021 धोरणांच्या विरोधात हे आंदोलन केले जाईल असे युनियनकडून सांगण्यात येत आहे.

28-29 मार्चला होणाऱ्या देशव्यापी संपाचा मोठा परिणाम हा बँकिंग सेवांवर होऊ शकेल असे स्टेट बँकेकडून खातेधारकांना सुचित करण्यात आले आहे. सेंट्रल ट्रेड युनियनच्या जॅाईंट फोरमकडून सोमवारी आणि मंगळवारी सरकारच्या धोरणांविषयी आक्रमक भूमिका घेत हा संप पुकारण्यात आला आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॅाईज असोसिएशनने ( All India Bank Employees Associatiion) या संपाला पाठिंबा दिलेला आहे. सर्व संघटनांची 22 मार्च रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करून या दोन दिवसीय संपाची घोषणा करण्यात आली.

केंद्र सरकारचे कर्मचारी विरोधी, किसान विरोधी, जनता विरोधी आणि राष्ट्र विरोधी असणाऱ्या धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे अशी माहीती कर्मचारी संघटनांनी दिली. बँक युनियन सरकारी बँकाच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध तीव्र भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने 2021च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी बँकाचे खासगीकरण करत असल्याची घोषणा केली.

बँकांमध्ये असे कित्येक कर्मचारी आहेत जे निवृत्त होणार आहेत, जर ते या संपात सहभागी होत असतील तर त्यांच्या सुविधांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, विमा आणि डाक या सर्व विभागांचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि सुरक्षा विभागाशी संबंधीत कर्मचारी देखील या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता तयारीत आहेत.

हेही वाचा

Back to top button