RSS नेही मान्य केलं देशांतर्गत बेरोजगारीचं संकट; सरकारला दिला ‘हा’ सल्ला | पुढारी

RSS नेही मान्य केलं देशांतर्गत बेरोजगारीचं संकट; सरकारला दिला 'हा' सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सामान्यपणे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर आपली मते मांडत असते. मात्र, संघाने पहिल्यांदाच ‘रोजगार’ या विषयावर प्रस्ताव पारित केला आहे. अहमदाबाद येथे भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रातिनिधीक सभेमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रस्ताव पारित केला आहे.

यामध्ये संघाने (RSS) सरकार आणि समाजाला आवाहन केले आहे की, एकत्र येऊन आर्थिक माॅडेल तयार करायला हवे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. संघाच्या या प्रस्तावावर सांगितले आहे की, “कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीत हे खूप महत्वाचं आहे की, अत्यंत वेगाने रोजगारांची निर्मिती व्हायला हवी.” यावेळी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासहीत १२०० पदाधिकारी उपस्थित होते.

संघाने बरोगारीवर बोलणं हे विशेष आहे. कारण, मागील ७ वर्षांमध्ये संघाकडून घराणेशाही, भाषा, राम मंदीर, बंगाल आणि केरला राज्यातील हिंसा, हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढणारे असंतुलन या विषयांवर प्रस्ताव पारित केले जात होते. संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले म्हणाले की, “कोरोना महामारीमुळे लोकांच्या उदर-निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निकालात काढणं गरजेचं आहे.”

होसबाले म्हणाले की, “आम्ही प्रस्ताव पारित केलेला आहे. आम्हाला भारतीय जनतेच्या सामर्थ्याची कल्पना आहे. आम्हाला माहीत आहे की, आत्मनिर्भर कसे व्हायचे. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शेती आणि हस्तोद्योगाच्या माध्यमातून देशात रोजगार निर्माण केला जाऊ शकतो. संघाने प्रस्तावात रोजगारनिर्मितीसाठी भारतीयत्वावर आधारित आर्थिक निती लागू करण्याची चर्चा केली आहे. आम्ही संकटकाळी कोणती आव्हाने उभी राहतात ते पाहिलेले आहे. अशा परिस्थितीत स्थायी विकास माॅडेलची गरज आहे. आमची इच्छा आहे की, विद्यापीठ, लहान उद्योग आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन या बेरोजगारीच्या प्रश्नाला दूर करण्याचा प्रयत्न करावा.”

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं ‘झुंड‘विषयी ?

Back to top button