युद्धामुळे देशात महागाई वाढणार ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे संकेत | पुढारी

युद्धामुळे देशात महागाई वाढणार ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रशिया-युक्रेन युद्धामुळे देशांतर्गत महागाईत वाढ होणार असून, विशेषत: पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकण्याचे संकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (दि.27) दिले. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या देशातील 1,200 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या डॉ. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. युद्धामुळे महागाई तर वाढणारच असून, इंधनाच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. पण इंधन दरांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून 1,200 विद्यार्थी गेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.

देशांतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकीकरणानंतर 12 बँका व त्यांच्या शाखा सुरू आहेत. या बँकांचा कारभार सुरळीत सुरू राहावा, यासाठी राज्यांचे दौरे करून आढावा घेत आहोत. महाराष्ट्रात विभागीय बैठका घेणार असून, उत्तर महाराष्ट्राची बैठक नाशिकमध्ये घेतली जाईल, अशी माहितीही ना. डॉ. कराड यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविताना प्रकरणे रेंगाळणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही बँकांना केल्याचे त्यांनी सांगितले.

राणे प्रकरणावर योग्य वेळी बोलेन :

अभिनेत्री दिशा सालियन घटनेतील बदनामी प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. याबाबत ना. डॉ. कराड यांना विचारले असता, याविषयी योग्यवेळी बोलेन, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. नाशिकमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर सीए, करसल्लागार व बुद्धिजीवी वर्गाशी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. महापालिका निवडणुकीत त्याचा भाजपला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button