chhatrapati shahajiraje : शहाजीराजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार होणार | पुढारी

chhatrapati shahajiraje : शहाजीराजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार होणार

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : होदिगिरे परिसरातील स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे ( chhatrapati shahajiraje ) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून पहिल्या टप्प्यात पाच लाखांचा निधी छत्रपती शहाजीराजे स्मारक विकास समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

होदिगिरे (ता. चन्नगिरी, जि. दावणगिरी) येथे छत्रपती शहाजीराजे ( chhatrapati shahajiraje ) यांची समाधी मोकळ्या जागेत आहे. नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केंद्रीय पुरातत्त्व खात्यास समाधीची जागा संवर्धित करण्यास सांगितले. त्यानंतर 21 गुंठे जागेत ही समाधी सध्या सुरक्षित आहे. मात्र, या समाधीवर छत्र नसल्यामुळे ती ऊन, वारा आणि पावसामुळे तशीच उघड्यावर आहे. या समाधीबाबत इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी सोशल मीडियात सद्यस्थिती मांडली. याची दखल घेत डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने तातडीने दौरा आखून समाधी संवर्धन समितीकडे पाच लाखांचा धनादेश फाऊंडेशनचे प्रमुख सदस्य मंगेश चिवटे यांच्यामार्फत समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. समाधिस्थळाचे पूजन विश्वास पाटील, मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण, अतुल चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे, सचिव रामचंद्र राव, सदस्य मंजुनाथ पवार, श्यामसुंदर सूर्यवंशी, अण्णोजीराव पवार आदी उपस्थित होते.

आर्थिक मदतीचे ठोस आश्वासन

मंत्री एकनाथ शिंदे यांनी जी काही मदत लागेल, ती करण्याचे ठोस आश्वासन छत्रपती शहाजीराजे ( chhatrapati shahajiraje ) स्मारक विकास समितीच्या सदस्यांना दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्री शिंदे यांनी समाधीची सद्यस्थिती आणि विकास आराखड्याबाबत माहिती जाणून घेतली आणि लवकरच समाधिस्थळास भेट देण्याचे आश्वासन दिले. शहाजीराजेंच्या पराक्रमाला साजेशे स्मारक उभारू, अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

 

Back to top button