मोठा दिलासा! पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर, २४ तासांत कोरोनाचे २५ हजार नवे रुग्ण, ४९२ मृत्यू | पुढारी

मोठा दिलासा! पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर, २४ तासांत कोरोनाचे २५ हजार नवे रुग्ण, ४९२ मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात हळूहळू कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. गेल्या सहा दिवसांपासून ५० हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित आढळत आहेत. गेल्या एका दिवसात कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५ हजार ९२० नवे रुग्ण आढळून आले. तर ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ४,८३७ ने कमी आहे. दिवसभरात ६६ हजार २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या २ लाख ९२ हजार ९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत देशातील एकूण ४ कोटी १९ लाख ७७ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

याआधीच्या दिवशी ३० हजार ७५७ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ५४१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ६७ हजार ५३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.०३ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.६१ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.०४ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात १२ फेब्रुवारीला ४४ हजार ८७७ दैनंदिन कोरोनाबाधित आढळले होते. १३ फेब्रुवारीला ३४ हजार ११३, १४ फेब्रुवारीला २७ हजार ४०९ तसेच १५ फेब्रुवारीला ३० हजार ६१५ कोरोनाबाधित आढळले होते. आता सहाव्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली आली.

कोरोना विरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७४ कोटी ६४ लाख ९९ हजार ४६१ डोस देण्यात आले आहेत. यातील ३४.७५ लाख डोस बुधवारी दिवसभरात देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत १.८२ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १७१ कोटी ६७ लाख ६६ हजार २२० डोस पैकी ११ कोटी ७३ लाख १७ हजार ४५१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७५ कोटी ५५ लाख ३२ हजार ४६० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ११ लाख ७९ हजार ७०५ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

गोव्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने गोव्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

ब्राझिलमध्ये एका दिवसात १,११८ जणांचा मृत्यू

मेक्सिकोत कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. येथे नवीन ४७० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर ब्राझीलमध्ये १ लाख ३१ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर येथे एका दिवसात १,१२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button