Money Laundering : सचिन वाझे, पालांडे, शिंदेची आजपासून पुन्हा चौकशी | पुढारी

Money Laundering : सचिन वाझे, पालांडे, शिंदेची आजपासून पुन्हा चौकशी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पुन्हा चौकशी करण्यासाठीचा अर्ज सीबीआयने सोमवारी दाखल केला आहे. पीएमएलए न्यायालयाने त्याची दखल घेत सीबीआयला पुढील दोन दिवस चौकशी करण्यास परवानगी दिली. (Money Laundering)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. 21 एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तास चौकशी केल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.

29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.

देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान, सीबीआयने देशमुखांचे स्वीय सहायक पालांडे आणि कुंदन शिंदे यांची यासंदर्भात आणखी चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला. या दोघांचेही जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली. ती मान्य करण्यात आली. देशमुख यांच्या जामीन अर्जावरही सीबीआयने हरकत घेतली आहे. (Money Laundering)

बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेचीही चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून करण्यात आली. त्याचीही अनुमती देत न्यायालयाने सीबीआयला मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी तळोजा कारागृहात जाऊन सचिन वाझेचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास परवानगी दिली.

Back to top button