आधुनिक ‘सत्यवाना’ने ‘सावित्री’ला सोडविले मृत्यूच्या तावडीतून! | पुढारी

आधुनिक ‘सत्यवाना’ने ‘सावित्री’ला सोडविले मृत्यूच्या तावडीतून!

पाली : वृत्तसंस्था  

पत्नीला कोरोना झाला. नंतर प्रकृती आणखी बिघडली. उपचारावर सव्वा कोटी रुपये खर्च आला. पैशांची जमवाजमव करण्यासाठी डॉक्टर पतीने 70 लाख रुपयांत आपली एमबीबीएस ही पदवी गहाण ठेवली.

राजस्थानातील पाली जिल्ह्यातील खैरवा गावातील डॉ. सुरेश चौधरी यांनी त्यांची पत्नी अनिता यांच्यासाठी हे दिव्य केले. अनिता यांच्यावर जोधपूर एम्समध्ये उपचार सुरू होते आणि डॉक्टरांना कोरोना काळात सुट्टी नसल्याने डॉ. सुरेश हे ड्युटीवर होते. 30 मे रोजी अनिता अत्यवस्थ झाल्या. फुफ्फुस 95 टक्के बाधित झालेले होते. वाचणे कठीण आहे, असे एम्समधून कळले. डॉ. सुरेश यांनी हार मानली नाही.
अहमदाबादेतील एका खासगी रुग्णालयात अनिता यांना दाखल केले. 87 दिवस त्या ईसीएमओ मशिनवर होत्या. दररोजचा खर्च एक लाखांहून अधिक होता. अखेर 88 व्या दिवशी अनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सहकारी डॉक्टरांनीही डॉ. सुरेश यांना 20 लाख रुपयांची मदत केली.

मग काहीही संपलेले नाही!

खारडा गावातील प्लॉटही डॉ. सुरेश यांनी पत्नीसाठी विकून टाकला. आता डॉ. सुरेश यांच्याकडे मालमत्ता म्हणून काहीही उरलेले नाही, पण ते म्हणतात पत्नी अनिता जिवंत आहे ना, मग काहीही संपलेले नाही!

Back to top button