पुणे : जुन्नर तालुक्यातील खामुंडी गाव झाले बिबट्याचे माहेरघर | पुढारी

पुणे : जुन्नर तालुक्यातील खामुंडी गाव झाले बिबट्याचे माहेरघर

ओतूर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा : खामुंडी (ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरात साधारण आठ दिवसांपूर्वीपासून भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाले असून आत्तापर्यंत एकाच आठवड्यात या भागात हा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

रवींद्र डोंगरे व कैलास शिंगोटे आणि किसन शिंगोटे या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीजवळच काही दिवसांपूर्वी ओढ्यात जखमी अवस्थेतील दोन बिबट्यांना वनविभागाने जखमी अवस्थेत असताना ताब्यात घेतले होते. अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी पुन्हा झाली. याच परिसरात असणारे शेतकरी महेश गंभीर, संदीप गंभीर यांच्या शेतजमिनी जवळच्या ओढ्यात बिबट्याचा आणखी एक तिसरा बछडा दिसून आला.

उपेंद्र डुंबरे यांनी त्वरित पत्रकार कैलास बोडके यांना संपर्क केला असता बोडके यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वनक्षेत्रपाल सुधाकर गिते यांना संपर्क करून घटना कळवली. जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निखिल बनगर, ओतूर वनक्षेत्रपाल वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक महेंद्र ढोरे, वैभव नेहरकर, आकाश डोळे, किसन केदार, महेंद्र ढोरे, साहेबराव पारधी, गंगाराम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ओढ्यात असणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला रेस्क्यू करून ताब्यात घेतले व उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे. माणिकडोह येथे डॉ. निखिल बनगर हे बिबट्याच्या बछड्यावर सध्या उपचार करत असल्याची माहिती सुधाकर गिते यांनी दिली असून याच परिसरात आठ दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दोन मादी बिबट्यापैकी एकाचा हा बछडा असावा, अशी शक्यता वनविभागाच्या वतीने वर्तविन्यात आली आहे.

तर आज मिळून आलेला बछडा हा नऊ महिने वयाचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे .मात्र या परिसरात आढळून येत असलेल्या बिबट्यांमुंळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले असून दिवसा शेतात काम करणे मुश्किल झाले आहे.

डॉ. बनगर यांची बिबटे वाचविण्यात निर्णायक भूमिका

एकाच जागी बिबटे आढळून येण्याच्या या तीनही घटनेमध्ये वन्यजीव पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी प्रमुख भूमिका बजावली असून तीनही बिबट्याना त्यांनी केलेल्या उपचारामुळे जीवदान मिळालेले आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button