सौंदत्तीतील रेणुका देवी दर्शनाला परवानगी, मात्र यात्रेला नाही | पुढारी

सौंदत्तीतील रेणुका देवी दर्शनाला परवानगी, मात्र यात्रेला नाही

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ः सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानच्या यात्रेला परवानगी देण्यात आली नसून, कोरोना मार्गसूचीचे पालन करत दर्शनाला परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी दै. ‘पुढारी’ला दिली. ही यात्री 16 फेब्रुवारीपासून पुढील 45 दिवसासाठी भरणार होती. रेणुकादेवी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनीही कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या शिष्टमंडळाला यात्रेला परवानगी नसल्याची माहिती दिली आहे. हे शिष्टमंडळ शनिवारी त्यांना भेटले.
शासनाने राज्यभरातील मंदिर आणि देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांना मुभा दिली आहे.

मात्र, सण, उत्सव, यात्रा आदींवर लावलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. पौर्णिमा यात्रेला परवानगी दिली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी रविवारी दिली. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी दुपारी सौंदत्ती येथे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांची भेट घेतली. दर्शनासंदर्भात शासनाने जारी केलेली माहिती, त्याचबरोबर विविध कामासंदर्भात चर्चा करण्यात आली.रवी कोटारगस्ती म्हणाले, देशासह राज्यातील कोरोना संक्रमणाची माहिती घेऊन शासनाने कोरोनाचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. देवस्थानांमध्ये भाविकांना अटी आणि नियमानुसार दर्शनाची मुभा दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करत भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देताना मास्क आणि सामाजिक अंतर यासंदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र शासनाने यात्रा सण-उत्सवाला अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सौंदत्ती रेणुका देवीची पौर्णिमा यात्रा होणार नाही. ही यात्रा 16 फेब्रुवारीपासून सुरु होणार होती. भाविकांना अन्य विधी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष मोहन साळोखे, सुभाष जाधव, अच्युतराव साळोखे, तानाजी चव्हाण, केशव माने, दयानंद घबाडे, रमेश बनसोडे, युवराज मोळे, गजानन विभुते, तानाजी बोरचाटे, हिरालाल चव्हाण आदी उपस्थित होते.

रेणुका देवीच्या दर्शनाला परवानगी दिली आहे. दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना राहण्यासाठीही मंदिर परिसरात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यात्रेनिमित्त दुकाने, हॉटेलना परवानगी नाही. कोरोना मार्गसूचीचे पालन करत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
– एम. जी. हिरेमठ
जिल्हाधिकारी, बेळगाव

हेही वाचलतं का?

Back to top button