Thane : बोगस चेक वटवून 100 बँकांची कोट्यवधींची फसवणूक | पुढारी

Thane : बोगस चेक वटवून 100 बँकांची कोट्यवधींची फसवणूक

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : देशातील जवळपास 100 पेक्षा जास्त बँकांचे बनावट चेक (धनादेश) तयार करून कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी ठाणे पोलिसांनी गजाआड केली. त्यांच्याकडे 24 कोटींचे एचडीएफसी बँकेचे बनावट चेक सापडले आहेत. यातील मास्टरमाईंडला गुजरातमधून बेड्या ठोकल्यानंतर या टोळीचे कारनामे उघड झाले. पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना जेरबंद केले आहे. (Thane)

आतापर्यंत या टोळीने 10 कोटी रुपये लुटल्याचे समोर आले असले तरी हा आकडा 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुजरात, तामिळनाडू व कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

डोंबिवलीतील इंडस टॉवर प्रा. लि. नामक कंपनीच्या नावाचा 24 कोटी रुपयांची रक्कम नमूद असलेला चेक 1 ऑक्टोबर 2021 रोजी एचडीएफसी बँकेच्या दावडी शाखेत जमा केला. विशेष म्हणजे त्या चेकवर असणार्‍या सह्यादेखील तंतोतंत जुळत होत्या.

मात्र, चेकची प्रिंट वेगळ्या शाईत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ब्रँच मॅनेजर विशाल व्यास यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी या चेकवर संशोधन केले असता हा चेक पूर्ण बोगस असल्याने बँक मॅनेजर विशाल व्यास यांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

मोठी टोळी सक्रिय

यामागे मोठी टोळी सक्रिय असल्याने या प्रकरणासह टोळीचा छडा लावण्यासाठी डोंबिवली विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जय मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्रीकृष्ण गोरे, भानुदास काटकर, संजीव मासाळ, विनोद ढाकणे आणि सुशील हांडे या सहाजणांच्या पथकाने तपास सुरू केला. गुन्ह्याची व्याप्ती पाहता यातील आरोपींनी महाराष्ट्रासह इतर राज्यांतही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

त्यानुसार पोलिसांनी गुजरातच्या भावनगरमधील आनंद येथे राहणारा भावेशकुमार लक्ष्मणभाई ढोलकिया (वय 43) या मास्टर माईंडला ताब्यात घेतले. त्याच्यासह हरिश्चंद्र कडव (65), नितीन शेलार (40), अशोक चौधरी (40) मजहर ऊर्फ मुजहीद खान (20), उमर फारूक (37) आणि सचिन साळसकर (29), अनेक ओतारी (30) अशा 8 जणांना अटक केली. यातील हरिश्चंंद्र कडव, नितीन शेलार, अशोक चौधरी आणि मजहर ऊर्फ मुजहीद खान या चौघांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.

या आरोपींकडून कोणत्या बँकेचे किती चेक वटविण्यात आले, याबाबतचा तपशील आता पोलिस एकत्र करत आहेत. आणखी दोन ते तीन दिवसांमध्ये बर्‍याच गोष्टी उघड होतील, असे सांगण्यात आले.

Thane : बँकेतून गोपनीय माहिती काढत अशी करत होते फसवणूक

या टोळीकडून मोठ्या कंपन्यांच्या बँकेत असलेल्या खात्यांना लक्ष्य केले जात असे. एकदाच मोठ्या आकड्याच्या स्वरुपात रक्कम मिळेल यासाठी टोळीचा म्होरक्या भावेशकुमार ढोलकिया याच्याकडून मोठ्या कंपन्यांच्या बँकेत असलेल्या अकाऊंटची माहिती काढली जायची.

उपलब्ध माहितीच्या आधारे खात्यावर असलेला बॅलन्स, खातेधारकाच्या स्वाक्षर्‍यांचे फोटो, इत्यादी माहिती घेऊन त्याआधारे साध्या चेकवरील खात्याचा नंबर खोडून त्यावर खातेधारकाचा खाते क्रमांक लॅपटॉप व प्रिंटरच्या सहाय्याने तयार केला जात असे. या चेकवर खातेधारकाची बनावट सही करून तो चेक बँकेत वटविण्यास दिला जायचा.

या चेकच्या आधारे ही टोळी बँकांतून मोठ्या स्वरुपात रकमा काढून त्या पैशांवर मौजमजा करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
बँकांतील कर्मचार्‍यांवर

संशयाची सुई

मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात मानपाडाव्यतिरिक्त गुजरात राज्यातील 3, तामिळनाडू व कर्नाटक राज्यांतील प्रत्येकी 1 गुन्हा असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. बोगस चेककांडात बँकांशी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचाही प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे या चेककांडाचा छडा लावणारे सपोनि श्रीकृष्ण गोरे यांनी सांगितले. (thane)

बँकांना पोलिसांचे आवाहन

बोगस चेककांडानंतर पोलिसांनी सर्व बँकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बँकेत ज्या अकाऊंटमधून बरेच दिवस पैशांचे व्यवहार झालेले नाहीत, अशा अकाऊंटमधून अचानक मोठ्या स्वरुपात रकमा चेकद्वारे काढण्यासाठी कोणी आल्यास त्यांची सर्व शहानिशा करावी. काही संशयास्पद आढळून आल्यास संबंधित पोलिस ठाण्यात तत्काळ माहिती द्यावी, असेही आवाहन पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.

thane : आरोपी उच्चशिक्षित, लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेले

या गुन्ह्यातील आरोपी सचिन साळसकर याने बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. कॉम्प्युटर प्रशिक्षित असलेला हा बदमाश बनावट चेक बनविण्यात पारंगत आहे. उमर फारूक हा पूर्वी दुबईत नोकरीला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्यानंतर त्याच्याकडे काम नव्हते. या टोळीचा मास्टरमाईंड भावेशकुमार ढोलकिया याने गुजरातच्या भावनगरमध्ये एका डायमंड कंपनीत नऊ वर्षे नोकरी केली. पदवीधर असलेला हा बदमाश जागा-जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तो कधीही घरी थांबत नसे. त्याचा मुक्काम कायम वेगवेगळ्या हॉटेलमध्ये असे.

Back to top button