वाशिम : २ महिने बेपत्ता शिवदासचे काय झाले? ‘त्या’ सांगाड्याने खळबळ; DNA देणार उत्तर | पुढारी

वाशिम : २ महिने बेपत्ता शिवदासचे काय झाले? 'त्या' सांगाड्याने खळबळ; DNA देणार उत्तर

अजय ढवळे, पुढारी वृत्तसेवा, वाशिम येथील मालेगाव तालुक्यातील किन्ही राजा या गावाजवळील जंगलात एका अल्पवयीन मुलाचा सांगाडा मिळून आला आहे. याच गावातील शिवदास देविदास गोदमले (वय १५) हा दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्ण सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी हा मृतदेह शिवदासचाच आहे का याची तपासणी करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवदास यांच्याशी साधर्म्य असणारा मृतदेह सापडल्याने गोदमाले कुटुंबीय पूर्णपणे हवालदिल झाले आहे.

नेमकी घटना काय?

किन्ही राजा येथील जोगलदरीचे (वॉर्ड क्रमांक ३) रहिवाशी देविदास गोदमले यांचा मुलगा शिवदास हा १ एप्रिलला बैलांना चरण्यासाठी शेतशिवारात गेला होता. सायंकाळी बैलजोडी परत आली, पण शिवदास काही घरी परतला नव्हता. काही वेळ वाट पाहिल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांनी शिवदासची शोधाशोध सुरू केली, पण शिवदासचा शोध लागला नाही. शिवदासच्या आईने त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. गोरा रंग, उंची ४ फूट, अंगात कथिया रंगाचा चौकडीचा शर्ट, जांभळ्या रंगाची नाईट पँट आणि उजव्या हातावर ‘शिवदास’ असे गोंदण असल्याचे शिवदासचे वर्णन करण्यात आले आहे. शिवदासला अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या संदर्भात जऊलका पोलिस ठाणे अधिक तपास करत आहे. तर दुसरीकडे शिवदासचे नातेवाईक आणि मित्रपरिवार रात्रीचा दिवस करून त्याचा तपास घेत आहेत.

सांगाडा सापडल्याने रहस्य वाढले?

पण सोमवारी (२७ मे) किन्ही राजाच्या जवळच्या जंगलात एक मृतदेह पडला असल्याचे येथील वनमजुरांना लक्षात आले. ही माहिती वनमजुरांनी जऊलका पोलिस स्टेशनला कळवली. या मृतदेहावर कथिया रंगाचा चौकडी शर्ट, निळ्या रंगाची पँट, काळी चप्पल मिळाली आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मृतदेहावरील कपडे आणि बेपत्ता असलेल्या शिवदासचे कपडे एकसारखेच असल्याने गावात खळबळ माजली. हा मृतदेह शिवदासचा असल्याची शंका गावकरी व्यक्त करू लागले.

DNA चाचणी होणार

या सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी DNA तापासणी केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. “सापडलेला मृतदेह १५ वर्षीय मुलाचा आहे, त्यामुळे सध्या हा मृतदेह शिवदासचा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पण हा सांगाडा कोणाचा हे वैद्यकीय अहवालाशिवाय सांगता येणार नाही. हा मृतदेह कोणाचा, त्याचा मृत्यू कशामुळे झाला याची उत्तरे वैद्यकीय आणि डीएनए चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे.”

हेही वाचा : 

Back to top button