जनावरांच्या गोठ्यात भरते शाळा, डिसले गुरुजींनी पुरस्कारासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप | पुढारी

जनावरांच्या गोठ्यात भरते शाळा, डिसले गुरुजींनी पुरस्कारासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील परितेवाडी गाव आदीवासी भागात आहे. येथे जनावरांच्या गोठ्यात शाळा भरते अशी खोटी माहिती रणजीत डिसले गुरुजी यांनी पुरस्कारासाठी दिली आहे. त्यांनी पुरस्कारासाठी गावाची बदनामी केली असल्याचा आरोप जि. प. सदस्य भारत आबा शिंदे यांनी केला आहे.

ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त रणजीत डिसले गुरुजी सध्या चर्चेत आहेत. अमेरिका येथे शिष्यवृत्तीसाठी जाण्यासाठी प्रशासन रजा मंजूर करीत नाही. पैशाची मागणी केली जाते अशा आरोप त्यांनी केला होता. शुक्रवारी जिल्हा परिषदेची ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत जिल्हा परिषदेचे सदस्य भारत आबा शिंदे व प्रा. सुभाष माने यांनी डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केले.

यावेळी प्रा. सुभाष माने म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यानंतर डिसले गुरुजी प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. तीन वर्षे काम न करताच पगार घेतला. त्यामुळे त्यांच्याकडून पगार वसूल करण्यात यावा. शिक्षणमंत्री यांना ग्रामविकास खात्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. डिसले गुरुजी यांना अमेरिकेला जाण्यासाठी मंजूर केलेली रजा रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा परिषद सदस्यांनी डिसले गुरुजी यांच्यावर गंभीर आरोप केल्याने डिसले गुरुजी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जनावरांच्या गोठ्यात भरते शाळा )

हेही वाचलंत का? 

Back to top button