Yogi Adityanath : योगी आदित्यानाथ यांनी संपत्ती केली जाहीर, १ लाखांचे रिव्हॉल्व्हर, ८० हजारांची रायफल, सोन्याच्या रुद्राक्षाचाही समावेश | पुढारी

Yogi Adityanath : योगी आदित्यानाथ यांनी संपत्ती केली जाहीर, १ लाखांचे रिव्हॉल्व्हर, ८० हजारांची रायफल, सोन्याच्या रुद्राक्षाचाही समावेश

गोरखपूर ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी योगींसमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. (Yogi Adityanath)

सर्वांनी चालत जाऊन अर्ज दाखल केला. तत्पूर्वी योगींनी गोरखनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला, तसेच त्यांचे गुरू ब्रह्मलीन महंत अवेद्यनाथ यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले.

योगी आदित्यनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात १ कोटी ५४ लाख ९४ हजार ०५४ रुपयांची संपत्ती जाहीर केली. यात रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातून असेही घोषित केले की त्यांच्याकडे १२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपये किमतीची रायफल आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

योगी यांच्याकडे ४९ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि १० ग्रॅम वजनाचे रुद्राक्ष, गळ्यातील दागिने आहेत.

Yogi Aadityanath :  300 हून अधिक जागा जिंकू : अमित शहा

यानंतर गोरखपूर येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकू, असा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा इतिहास घडविणार आहे.

बुवा आणि बबुआ (मायावती आणि अखिलेश) यांच्या सरकारमध्ये जपानी फ्लूमुळे पूर्वांचलमध्ये मृत्यू होत होते. योगींचे सरकार आल्यावर पाच वर्षात हा रोग 90 टक्के कमी झाला आहे. योगींनी यूपीत कायद्याचे राज्य स्थापन केले. अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारींसारखे माफिया तुरुंगात आहेत. मोठे गुन्हेगार जामीन सोडून तुरुंगात जात आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दाच नाही. योगींच्या नेतृत्वाखाली यूपी सर्वोच्च स्थानी असेल. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल.

एकेकाळी गोरखपूर हे ठिकाण यूपी-बिहारच्या माफियांचे लपण्याचे ठिकाण होते. आज गोरखपूर विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे, असेही ते म्हणाले.

अखिलेश-जयंत चौधरी यांची टीका

ताजनगरी आग्रा येथे सपप्रमुख अखिलेश यादव आणि रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, यावेळी यूपीतील युवा परिवर्तनासाठी मतदान करतील. लोकशाही आणि संंविधान वाचविणारी ही निवडणूक असेल. आमची आघाडी बहुरंगी आहे. तर एकरंगी लोक संविधान नष्ट करू पाहत आहेत. निवडणुकीचा निकाल द्वेषाचे राजकारण करणार्‍यांसाठी धडा ठरेल. लाठी आणि बुलडोझर चालवून विकास होत नाही.

आमच्यातील गर्मी काढण्याची भाषा योगी करतात. युवकांना नोकरी मिळत नाही, मग त्यांच्यातील गर्मी कशी काढणार? गेल्या पाच वर्षांतील अन्यायाचा बदला युवक घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

Back to top button