औरंगाबाद : तुम्हाला सोडून जातेय, माझा शोध सुध्दा घेऊ नका, नर्स बायको मेसेज करून बेपत्ता | पुढारी

औरंगाबाद : तुम्हाला सोडून जातेय, माझा शोध सुध्दा घेऊ नका, नर्स बायको मेसेज करून बेपत्ता

बिडकीन (ता.पैठण) : पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय रुग्णालयात परिचारिका असलेल्या महिलेने मी खूप दूर जात असून, माझा शोध घेऊ नका असा पतीला मेसेज करून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस महिलेचा शोध घेत आहे.

शहरातील बीड बायपासवर रहाणाऱ्या ३२ वर्षीय पतीने बिडकीन पोलिसात दिलेल्या मिसिंग तक्रारीनुसार, आपल्या पत्नीला गुरुवारी (ता.०३) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी गाडीतून आपल्याकडे काम करत असलेल्या चालकाने पत्नी काम करत असलेल्या रुग्णालयात ड्युटीच्या ठिकाणी नेऊन सोडले.

त्यानंतर तक्रारदार असलेल्या व्यक्तीला पत्नीचा दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्हॉट्सॲपवर मेसेज आला की, मी खूप दूर निघून जात आहे, माझा शोध घेवू नका, फार्कतीचे कागदपत्रे तुम्हाला मिळुन जातील,असा मेसेज आल्याने पतीने तत्काळ नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला मात्र पत्नी मिळून आली नाही.

अनेक ठिकाणी शोध घेऊन पत्नी मिळत नसल्याने हतबल झालेल्या पतीने बिडकीन पोलीस ठाणे गाठत आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देत, मिसिंग दाखल केली. पोलिसांनी महिलेचा मोबाइल लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला असता, काल दुपारपासून फोन बंद असल्याने महिलेचा पत्ता लागू शकला नाही.

याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई राहुल बल्लाळ तपास करत आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button