गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह बातमी! Sensex १ लाखापर्यंत झेप घेईल, ‘या’ तज्ज्ञाचे मोठे भाकित | पुढारी

गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह बातमी! Sensex १ लाखापर्यंत झेप घेईल, 'या' तज्ज्ञाचे मोठे भाकित

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. कोरोनाची २०२० मध्ये भारतात एन्ट्री झाल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. पण त्यानंतरच्या दोन वर्षात बाजाराने सावरत मोठी झेप घेतली आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स (Sensex) ५८ हजारांवर जाऊन व्यवहार करत आहे.

दरम्यान, जेफरीजच्या इक्विटी स्ट्रेटजीचे ग्लोबल हेड ख्रिस्तोफर वूड (Christopher Wood) यांनी बीएसई सेन्सेक्स बाबत मोठे भाकित केले आहे. भारताचा महत्वाचा इक्विटी इंडेक्स बीएसई सेन्सेक्स २०२६ पर्यंत १ लाख अंकांपर्यंत झेप घेऊ शकतो. वूड यांनी त्यांच्या The GREED & fear नावाच्या ताज्या न्यूज लेटरमध्ये सेन्सेक्स (Sensex) संदर्भात हा सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.

पण पुढील पाच वर्षांत तो ७० टक्क्यांनी वाढू शकतो. त्यात वर्षाला ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामुळे खासगी भांडवली खर्चात (Private capital expenditure) मोठ्या प्रमाणावर वसुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे आगामी काळात कंपन्यांच्या कमाईत वाढ होईल आणि वाढत्या व्याजदराच्या काळातही भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत राहील. तसेच आगामी काही वर्षांत भारतीय शेअर बाजार आशियातील सर्वांत चांगली कामगिरी करणारा शेअर बाजार बनेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून होणारी व्याजदरात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ हे दोन मोठे धोके असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. भारतीय इक्विटी बाजार अमेरिकेच्या आर्थिक धोरणांबाबत फारसा चिंतित नसला तरी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितच धक्का बसेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबरच्या उच्चांकी स्तरावरुन सुमारे ५ टक्क्यांनी घसरल्यानंतर भारतीय शेअर बाजारात आणखी मोठी पडझड होण्याचा धोका नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. भारतीय बाजारातील नुकतीच झालेली घसरण ही गुंतवणूकदारांना चांगले शेअर खरेदी करण्याची संधी देत ​​असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button