इस्लामपूर : तर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; स्वाभिमानीचा इशारा | पुढारी

इस्लामपूर : तर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; स्वाभिमानीचा इशारा

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी पंपाचे वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या ऊसबीलातुन कपात करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत. सहकार मंत्र्यांच्या या अन्यायी निर्णया विरोधात त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला आहे.

भागवत जाधव म्हणाले ,पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजण शेतकऱ्यांच्या जिवावर मंत्री झाले. मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून वीज बिल वसुल करणार असल्याचे म्हटले आहे. आता वेळ आलीच तर सहकारमंत्री पाटील यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.

पुढे बोलताना भागवत जाधव म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना पदरात काहीच पडत नाही. मिश्र, पोटॅश या रासायनिक खतांच्या गोणीच्या किंमती दोन हजार रुपयांच्या घरात गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्या वगळता राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. महावितरण कडून आठवड्यात जेमतेम ५६ तास वीज दिली जात आहे. आणि महावितरण कडून अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत. यावरती कोणतेच मंत्री बोलत नाहीत. आता, शेतकऱ्यांच्या ऊसबीलातुन वसूली करण्याचा निर्णय अन्याय कारक आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरावर मोर्चा काढून घरा समोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल.

अगोदर नैतिक जबाबदारी पार पाडा…

तसेच, भागवत जाधव म्हणाले, कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील साखर कारखान्यानी एकरकमी एफ्आरपी दिलेली नाही. अगोदर सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळवून द्यावी. ती त्यांची नैतिक जबाबदारी ते विसरून अन्यायी वसूलीचा घाट घातला आहे. मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याने एकरकमी रक्कम आधी द्यावी.

Back to top button