रोज 52 सेकंदांसाठी स्तब्ध होते ‘हे’ शहर! | पुढारी

रोज 52 सेकंदांसाठी स्तब्ध होते ‘हे’ शहर!

हैद्राबाद : तेलंगणामध्ये नालगोंडा नावाचे एक शहर असून ते रोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होते. याचे कारण म्हणजे या शहरात रोज सकाळी साडेआठ वाजता लाऊडस्पीकरवरून राष्ट्रगीताची धून वाजवली जाते. त्यावेळी शहरातील सर्व व्यवहार थांबतात आणि लोक उभे राहून राष्ट्रगीत म्हणतात. यासाठी शहरातील वेगवेगळ्या मुख्य ठिकाणी बारा मोठे लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत.

ज्या लोकांनी ही मोहीम सुरू केली त्यांचा उद्देश हा आहे की संपूर्ण शहराकडून राष्ट्रगीताचा रोज सन्मान व्हावा. ‘नालगोंडा जन गण मन उत्सव समिती’कडून हा उपक्रम सुरू करण्यात आला. 23 जानेवारी 2021 पासून हा उपक्रम सुरू आहे. ज्यावेळी शहरात राष्ट्रगीताची धून वाजवली जाते त्यावेळी समितीचे लोक शहरात ठिकठिकाणी हातात तिरंगा घेऊन उभे राहतात.

स्थानिक अधिकार्‍यांनीही या उपक्रमास पाठिंबा दिला असून शहरात अन्यही काही ठिकाणी यासाठी लाऊडस्पीकर लावले जाणार आहेत. राष्ट्रगीत सुरू होताच सर्व लोक आपापली कामे थांबवून उभे राहतात व रस्त्यांवर वाहनेही थांबतात.

तेलंगणामधीलच करीमनगर जिल्ह्यातील जम्मीकुंता शहरात असा उपक्रम आधी सुरू करण्यात आला. त्यापासून प्रेरणा घेऊन नालगोंडा शहरानेही हा उपक्रम सुरू केलेला आहे.

हेही वाचा

Back to top button