अंतराळात दिसले एक हजार चमकते धागे! | पुढारी

अंतराळात दिसले एक हजार चमकते धागे!

वॉशिंग्टन : अनादी व अनंत असे ब—ह्मांड अनेक अनोख्या गोष्टींनी भरलेले आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत एक हजार रहस्यमय चमकते धागे पाहिले. या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘रेडिओ फिलामेंटस्’ असे म्हटले जाते. जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप ‘मीरकॅट’च्या सहाय्याने या रेडिओ फिलामेंटस्चा शोध घेण्यात आला.

हे रेडिओ फिलामेंटस् वास्तवात एखाद्या रेडिओ एनर्जीच्या स्फोटामुळे बनलेले आहेत. त्यांची लांबी 150 प्रकाशवर्ष इतकी आहे. एका वर्षात प्रकाशकिरण जितके अंतर कापतो त्याला ‘1 प्रकाशवर्ष’ म्हटले जाते. हे अंतर सर्वसाधारणपणे 9.4 खर्व किलोमीटर इतके असते. तब्बल 150 प्रकाशवर्ष अंतरापर्यंत फैलावलेले हे रेडिओ फिलामेंटस् अंतराळात मेंदूच्या नसांसारखे दिसतात. काही धागे जोड्यांमध्ये आहेत व ते शरीरातील डीएनएसारखे दिसतात. त्यांच्यामध्ये ऊर्जा असल्याने ते सतत चमकत असतात. रेडिओ फिलामेंटस्च्या आसपास अब्जावधी इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. त्यांचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र असते व त्यामुळे ते प्रकाशाच्या गतीने फिरतात.

‘मिल्की वे’ मध्ये यापेक्षा दहा पटीने अधिक रेडिओ फिलामेंटस् असू शकतात असे संशोधकांना वाटते. हे फिलामेंटस् ज्या टेलिस्कोपने शोधले तो जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप ‘मीरकॅट’ दक्षिण आफ्रिकेच्या रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीमध्ये आहे. 64 अँटेनांचा हा टेलिस्कोप 8 किलोमीटर जागेत व्यापलेला आहे.

हेही वाचा

Back to top button