लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता, आहार काय असावा? | पुढारी

लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता, आहार काय असावा?

वाढत्या वयानुसार शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते; पण सध्या लहान वयातच अनेक मुलांमध्ये कॅल्शियमची मात्रा कमी असल्याचे दिसून येत आहे.

शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुलांचे दात तुटणे, उशिरा दात येणे आणि हाडे ठिसूळ होणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच पालकांनी मुलांच्या शरीरात कॅल्शिमयच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच कॅल्शियमची पातळी तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण, वेळीच निदान व उपचार न झाल्यास अन्य आजारांचा त्रास होऊ शकतो.

हाडे व दातांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांसाठी ही पोषकतत्त्वे अजून जास्त गरजेची असतात. कारण, वाढत्या वयासोबत हाडे आणि दातांचा विकास होत असतो आणि म्हणून कॅल्शियम खूप आवश्यक असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली, तर त्या स्थितीला हायपोकॅल्सेमिया असे म्हणतात. रक्तामध्ये कॅल्शियम कमी असल्यास हा आजार होऊ शकतो. कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे मुलांच्या वयानुसार वेगवेगळी दिसतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू लागतात. याशिवाय हाडांची झीज होऊन ऑस्टिओपोरोसिस हा आजार होऊ शकतो. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हिरड्यांचे आजार आणि दात किडतात. ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरीरातील कॅल्शियमची पातळी तपासून पाहणे अतिशय गरजेचे आहे. रक्त चाचणीनुसार शरीरातील कॅल्शिमयची मात्रा तपासून पाहिली जाते.

बर्‍याचदा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी जाणवते. यामुळे हाडांची झीज होते. सध्या लहान मुलांसह मोठ्यामध्ये ही समस्या दिसून येते. कॅल्शियमची कमतरता असल्यास ऑस्टियॉपोरिसिस हा आजार उद्भवू शकतो. यामुळे हाडे कमकुवत होतात.

याशिवाय अनेकदा स्टेरॉईडचा अतिवापर, किमोथेरपी, रेडिरेशन थेरपीमुळेही हाडांवर परिणाम जाणवतो. यामुळे हाडांना फ्रॅक्चर होणे, सांधेदुखी, हाडे दुखणे असे त्रास होऊ शकतात. रुग्णालयात उपचारासाठी काही रुग्ण हाडांमध्ये वेदना होत असल्याच्या तक्रारी घेऊन येतात. यातील काही लोकांना कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीची एक आठवडा गोळी देऊन प्राथमिक उपाय केला जातो.

अत्यंत गंभीर स्थिती असेल, तर नसांद्वारे रक्तामध्ये कॅल्शियम चढवले हाते. म्हणून आपल्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोयाबीन, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, संत्री, मासे, सुका मेवा, अंजीर यांचा समावेश करावा. याव्यतिरिक्त नियमित व्यायाम करणे आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळावेत यासाठी मोकळ्या हवेत बसून सूर्यप्रकाश घेण्यास प्राधान्य द्यावे.

डॉ. आनंद जाधव

Back to top button