IPL Auction : आयपीएल लिलावात ५९० खेळाडूंवर बोली लागणार! | पुढारी

IPL Auction : आयपीएल लिलावात ५९० खेळाडूंवर बोली लागणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचा आयपीएल मेगा लिलाव (IPL Auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणार आहे. मंगळवारी, बीसीसीआयने ५९० खेळाडूंची यादी जारी केली आहे जे लिलावाचा भाग असतील. या खेळाडूंमध्ये ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि २२८ कॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावात १० संघ सहभागी होणार आहेत. त्याच वेळी, ७ सहयोगी देशांचे खेळाडू देखील लिलावाचा भाग असतील. या लिलावात ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. ४८ खेळाडूंची बेस प्राईस २ कोटी, २० खेळाडूंची बेस प्राईस १.५ कोटी आणि ३४ खेळाडूंची बेस प्राईस १ कोटी आहे.

यावेळी अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे समोर आले आहेत. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलने लिलावात आपले नाव दिलेले नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट, ख्रिस वोक्स यांनीही आपली नावे लिलावात समाविष्ट केलेली नाहीत. (IPL Auction)

३३ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले… (IPL Auction)

आयपीएल (IPL Auction) २०२२ साठी ३३ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. ८ संघांनी २७ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्याच वेळी, २ नवीन आयपीएल संघांनी त्यांच्या संघात ६ खेळाडूंचा समावेश केला आहे. केएल राहुलला लखनऊने १७ कोटींमध्ये संघात सहभागी करून घेतले आहे. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. याआधी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला २०१८ ते २०२१ या हंगामात केवळ १७ कोटी रुपये मिळत होते. लखनऊने केएलला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे.

२०१८ सालानंतर आयपीएलचा पहिला मोठा लिलाव होणार आहे. आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात एकूण ८ संघ होते. यावेळी १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत. १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंवर एकूण ३३८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

रविचंद्रन अश्विन व्यतिरिक्त भारताकडून श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांची मूळ किंमत २ कोटी आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, कागिसो रबाडा, ड्वेन ब्राव्हो यांच्याशिवाय पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट आणि फाफ डू प्लेसिस यांसारखी मोठी नावे आहेत.


 

Back to top button