बिबट्या : ‘ती’ आली अन् बछड्यांना घेऊन गेली! | पुढारी

बिबट्या : 'ती' आली अन् बछड्यांना घेऊन गेली!

कासेगाव (सांगली); पुढारी वृत्तसेवा : वाटेगाव (ता.वाळवा) येथील खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी रात्री बिबट्याची (leopard) मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बिबट्या मादीने बछड्याला ठेऊन पळ काढला. ऊस फड मालकाने याची माहिती वनविभाग दिल्यानंतर प्राणी मित्र आणि वनविभागाने बछडा व त्याच्या आईची भेट घडवून आणली. त्यानंतर बिबट्या मादीचा बछड्याला घेऊन गेल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कासेगाव, वाटेगाव, भाटवाडी, शेणे, परिसरात बिबट्याने ( leopard ) धुमाकूळ घातला आहे. जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केलेच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी खोरी शिवारातील शिवाजी गावडे, जगन्नाथ गावडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची मादी व एक बछडा दिसला. गावडे यांनी याची माहिती वनविभागास दिली. वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे वनमजूर हे खोरी शिवारात आले. त्या परिसरात बछडा दिसला.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडून आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने येऊन बछड्याला अलगद उचलून घेवून जातानाचा व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.

Back to top button