तुळजापूर : अणदूरमधील देशप्रेमी रिक्षा चालकाची प्रजासत्ताक दिनी मोफत सेवा ! | पुढारी

तुळजापूर : अणदूरमधील देशप्रेमी रिक्षा चालकाची प्रजासत्ताक दिनी मोफत सेवा !

अणदूर (ता.तुळजापूर) ; पुढारी वृत्तसेवा

आपल्या प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना असतेच. कोण कधी कोणत्या प्रकारे व्यक्त करीत ते सांगता येत नाही. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी लोक आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात. माध्यम कोणतेही असले, तरी भावना महत्वाची असते.

अशाच एका देशप्रेमी रिक्षा चालकाने प्रजासत्ताक दिनी आपली रिक्षा स्वारी दिवसभरासाठी मोफत ठेवली होती. आपल्या रिक्षावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोफत सेवा व मोबाईल नंबर लिहून रस्त्याने ‘मोफत सेवा’ असा आवाज देत होता. निमित्त होते प्रजासत्ताक दिनाचे.

त्या रिक्षा चालकाचे नाव आहे दिनेश कुताडे. दिनेश कुताडे हे अणदूर (ता.तुळजापूर) बसस्थानकावर रिक्षा चालवतात. कधी अणदूर गावात तर कधी अणदूर-नळदुर्ग येथे. यातून त्यांना दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये मिळतात. यावरच ते आपला उदरनिर्वाह करतात. दिनेश यांना देशाविषयी असलेले प्रेम हे व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनी सकाळी ८:३० ते रात्रीपर्यंत सर्व प्रवाशांना मोफत सेवा देत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

लोकांनी दिनेश या देशप्रेमा विषयी अभिनंदन तर केलेच पण अनेकांनी आभारही मानले. आज एक स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवरती जायचे म्हंटले तरी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात, पण दिनेश यांनी आपल्या देश प्रेमासाठी दिवसभर लोकांची मोफत सेवा केली.

या मोफत सेवेविषयी दिनेशला विचारले असता म्हणाले की, आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा, राज्याचा अभिमान आहे. आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला या प्रजेची सेवा करता आली याचा मला आनंद आहे. पैसे रोजच मिळवतो. कधीतरी आपल्या गावातील लोकांची सेवा करायची होती ती मी या माध्यमातून केली. त्यामुळे मनाला समाधान वाटत आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button